*पऱ्या*
माझं बालपण सरंद या संगमेश्वर तालुक्यातील ठिकाणी गेलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या बालपणीच्या आठवणी म्हणजे मोरपिसा सारख्या असतात. बालपणीच्या या आठवणी म्हणजे खरंच मधाच्या पोळ्यासारख्या असतात. आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड हे असलं तरी माझे पप्पा कामाच्या निमित्तानं संगमेश्वर तालुक्यातल्या सरंद या ठिकाणी स्थायिक झालेले. माझा जन्म सरंदेत झाला नाही पण सगळं बालपण मात्र इथंच गेलं. इथल्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालतात.आम्ही जिथे रहायचो ते ठिकाण एका ओढ्याच्या काठावर होतं. आता त्या मोठ्या ओढ्याला तिथल्या बोलीभाषेमध्ये पऱ्या असं म्हटलं जायचं. पऱ्या म्हणजे एक ओढा . डोंगर कपारीतून वाहणारे असंख्य छोटे-मोठे ओढे-नाले या पऱ्याला मिळायचे आणि त्या सगळ्या ओढ्यांना नाल्यांना आपल्या पोटात सामावून तो पऱ्या गड नदीच्या दिशेने सुसाट वेगाने वाहत राहायचा.वयाची चाळीशी गाठल्याव...