आपकी याद आती रही रातभर

 *आपकी याद आती रही रात भर* 'आपकी याद आती रही रात भर ' हे १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गमन'  या चित्रपटातलं गाणं ऐकलं आणि मनात एक वेगळंच काहूर माजलं. स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं आणि छाया गांगुली यांच्या आवाजातलं हे गाणं मनाला स्पर्शून जाणारंच आहे.रात्र गडद होत जाते आणि कोणीतरी आठवत राहतं. तेव्हा त्या आठवणीतून मनामध्ये निर्माण होणाऱ्या आनंदलहरी किंवा दुःखाचा आर्तस्वर  यांच्या विविध रंगछटा आपल्याला या गाण्यामध्ये दिसतात. जेव्हा या गाण्याची माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की हे गाणं मखदूम मोईद्दीन या उर्दू शायराचं आहे.त्यांच्या लेखणीतून साकारलं  आहे. मखदूम मोईद्दीन हे नाव उर्दू साहित्य रसिकांना परिचित आहेच.  ४ फेब्रुवारी १९०८ रोजी  मेडक येथे जन्मलेले मखदूम मोईद्दीन हे उर्दूतले एक जानेमाने शायर तथा इन्कलाबी कवी! ऊस्मानिया  विद्यापीठाची त्यांनी  पदवी घेतली. प्रगतिक विचारांच्या जनवादी चळवळीमध्ये ते सक्रिय झाले आणि कष्टकऱ्यांच्या ,श्रमिकांच्या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले .प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची त्यांनी हैदराबाद मध्ये स्थापना केली .नंतरच्या काळात ते आमदारही झाले आणि लोकांचा आवाज बनून   विधिमंडळामध्ये आक्रमकपणे लढत राहिले. मखदूम मोईद्दीन यांची कविता नेहमीच लोकांच्या बाजूने लोकांचा आवाज बनून उतरली. उर्दू साहित्य प्रांतात मखदूम मोईद्दीन  यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. डाव्या प्रागतिक चळवळीतला हा कलावंत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही  अग्रेसर होता. सर्वसामान्य शोषण करणाऱ्या निजामशाहीविरुद्ध ही त्यांनी आपल्या कवितेतून एल्गार पुकारला. पण त्यांची स्वातंत्र्याची कल्पना ही खूप महत्त्वाची आहे.ती आपण समजून घ्यायला हवी.मखदूम मोईउद्दीन असे म्हणतात की,    *'वो दुनिया दुनिया क्या होगी जिस दुनिया मे स्वराज न हो, और आजादी आजादी क्या  मजदूर का जिसमे राज ना हो!"* म्हणजेच सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे राज्य ज्या  स्वातंत्र्यांमध्ये नाही ते स्वातंत्र्य काय कामाचं ? असा मर्मभेदी सवाल मखदूम मोईद्दीन यांनी या शेर मधून विचारला आहे. महाराष्ट्रातील प्रगतशील लेखक संघाची आघाडीचे कार्यकर्ते, इप्टाच्या चळवळीतले बिनीचे शिलेदार  आणि संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी सुद्धा स्वातंत्र्याच्या अनुषंगाने एक मर्मभेदी सवाल 'रामू कोंबडी चोर'या कथेमध्ये केला होता. त्या कथेचा नायक असे विचारतो की, *जे स्वातंत्र्य आमच्या जगण्यात काडीचाही बदल करू शकत नाही, ते स्वातंत्र्य काय कामाचं आहे?*    सर्वसामान्य ,कष्टकरी म,जूर गोरगरीब यांच्या विधानांची दखल ज्या व्यवस्थेमध्ये घेतली जाईल आणि त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारी व्यवस्था जिथे निर्माण होईल ,ते खरं स्वातंत्र्य असं या दोन्ही महान कलावंतांना म्हणायचं होतं. हे आपल्या लक्षात येतं .या अर्थाने पाहता मखदूम मोईद्दीन आणि अण्णा भाऊ साठे हे  दोनही महान कलावंत समविचारीच आहेत आणि समधर्मी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर अण्णा भाऊ साठे यांनी 'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली' ही छक्कड लिहिली. या रचनेने महाराष्ट्राचा जनतळ ढवळून निघाला आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सर्वदूर पोहोचली. या रचनेत विरहाचा आर्त व्याकुळ स्वर अधिक जोरकसपणे अण्णा भाऊ साठे यांनी मांडला आहे. तीच विरहाची एक व्याकुळ आर्त  भावना मगदूम यांनी याही गाण्यामध्ये अत्यंत तरलपणे जिवंत केली आहे. मखदूम यांची  ही एक अत्यंत लोकप्रिय अशी रचना आहे. खरंतर चळवळीतल्या या कवीने आपली प्रेम भावना इतक्या संवेदनशीलपणे आणि कलात्मकतेने शब्दबद्ध केली आहे की बस...! ऐकणाऱ्याला ऐकतच राहावं असं वाटतं आणि रसिकांसमोर ती विरहाच्या वणव्यात होरपळणारी रात्रच उभी राहते. मखदूम  म्हणतात की *"आपकी याद आती रही रातभर, चष्म ए मुस्कुराती रही रात भर!"*         छाया गांगुली यांनी अशा आवाजात आणि अशा अंदाजात ती गायली आहे की ,रसिकांच्या काळजाचा कधी ठाव घेतला जातो तेच कळत नाही. ऐकणारा या दोन ओळीतूनच एका अनोख्या विश्वामध्ये प्रवेश करतो आणि त्यालाही *कुणीतरी* आठवत राहतं. त्याच्याही आठवणींचा तळ ढवळला जातो. आणि एका अनामिक अस्वस्थतेतून मखदूम यांचा दुसरा शेर छाया गांगुलींच्या आवाजात कानावर पडतो. तेव्हा तर मखदूम  यांच्या लेखणीची कमाल दिसून येतेच .त्यातली कलात्मकता ,त्यातलं लालित्य आणि त्यातली भावात्मकता हे सारं सारं रसिकाच्या अक्षरशः अंगावरच येतं.दुःखाचा दिवा जळत रहावा आणि  तो अनुभवताना मनाची थरथर व्हावी ... मखदूम लिहीतात,             *"रातभर दर्द की शम्मा जलती रही, गम की लौ थरथराती रही रात भर!"*   मखदूम यांच्या शाहिरीतली ही तरलता रसिकांना भावते.खरंतर एका अनोख्या दुनियेची सफर मखदूम मोईद्दीन यांची लेखणी करते. कारण पुढच्या शेर मध्ये ते म्हणतात,  *यादोके चाँद दिल में उतरते रहे, चांदनी जगमगाती रही रात भर!*  'आपल्या प्रेयसीच्या आठवणींचे चंद्र हृदयात उतरत राहतात'ही कल्पना किती रोमँटिक  आणि किती तरल नाजूक आहे, हेही आपल्या लक्षात येते. या गजलेतला दर्द ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये एक वेगळाच थरार निर्माण करतो. त्या हृदयाच्या स्पंदनांना जोडून घेत छाया गांगुलींच्या  आवाजातला मखदूम यांचा पुढचा शेर आपल्या कानावर पडतो  *कोई दीवाना गलियो मे फिरता रहा, कोई आवाज आती रही रातभर!"* मखदूम यांच्या काव्य प्रतिभेचे हे  विलक्षण  रुप आपल्याला अनुभवायला मिळतं आणि ऐकणाऱ्याच्या मनातली 'दिवानगी' जागी होती. ऐकणाऱ्याच्या मनातलं हे दिवाणं होणं पुन्हा जिवंत होतं. भूतकाळातल्या अनेक घटनांचे संदर्भ हृदयाच्या कोपऱ्यात हृदयाच्या तळाशी थांबलेले असतात .सारे प्रवाह बंद झालेले असतात. ही गाणं आपण ऐकतो आणि त्या भूतकाळातल्या आठवणींचे, आपल्या प्रियतमेच्या दर्दभऱ्या आठवणींचे झरे कधी जिवंत होतात आणि खळखळ व्हायला लागतात हेच कळत नाही. एक सुंदर गाणं मनाला ,काळजाला ,हृदयाला स्पर्शून जातं. आपल्या प्रेयसीच्या आठवणींच्या वणव्यात जळलेल्या जळून विझलेल्या कैक रात्रींचा आलेख काळजावर उमटत राहतो. मखदूम यांच्या लेखणीचं हे यश आहे.त्या गजलेतलं दर्द मनाच्या आभाळात ढग होऊन बरसत राहतं...पुन्हा ओळ आठवत राहते...मनात रुंजी घालते....* *आपकी याद आती रही रात भर*

Comments

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??