मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे
ज्येष्ठ साहित्यिक, विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि मातंग समाजाच्या चळवळीतील पहिल्या पिढीचे बिनीचे शिलेदार शंकरराव भोरे गुरुजी तथा अण्णा यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाने मनाला प्रचंड वेदना झाल्या. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो.
अण्णांचा जन्म 1933 चा. त्यांचे वडील तमाशा कलावंत होते. त्याच कलेचा प्रभाव आणि संस्कार अण्णांच्यावर होता तो त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबितही झाला. स्वातंत्र्यपूर्व काळातील मातंग समाजाची स्थिती किती हलाखीची असेल याची कल्पनाच केलेली बरी! पण त्याही काळात अण्णा शिकले. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटलं होतं. त्यांचा पिंड कलावंताचा तसाच कार्यकर्त्याचा आहे शिक्षणाशिवाय मातंग समाजाला तरुण उपाय नाही हे त्यावेळी ओळखणारा हा माणूस! स्वतः शिकलेच पण असंख्य विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम अण्णांनी केलं. सातवी पास झाल्यानंतर ते शिक्षक झाले आणि एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांना असंख्य अडचणी आल्या.जातीचे चटकेही बसले परंतु शांतपणे अण्णांनी आपलं काम सुरूच ठेवलं. विद्यार्थ्यांना घडवण्या सोबतच अभावग्रस्त समाजामध्ये एक परिवर्तनाचा विचार करण्याचं काम अण्णा करत होते.पण अण्णांच्यातला एक समाजशील कार्यकर्ता आणि साहित्यिक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी लिहायला सुरुवात केली. सामाजिक कामाची आखणी करून प्रबोधनाची चळवळ गतिमान केली. मातंग समाजातल्या जुनाट आणि वाईट रूढी परंपरांना विरोध केला. समाजाचे सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने प्रबोधन केले. त्यांना सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा सहवास लाभला. त्यांच्याच प्रेरणेतून अण्णांनी लेखनाला सुरुवात केली 1964 ला 'अडाण्याचा गाडा' नावाचा कथासंग्रह त्यांनी लिहिला. हा कथासंग्रह महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यांनी अर्पण केला आणि विशेष म्हणजे या कथासंग्रहाला अण्णाभाऊ साठे यांची प्रस्तावना होती. त्यांची एकूण 34 पुस्तके प्रकाशित झाली.18 कादंबऱ्या,काही कथासंग्रह, 'शिदोरी' नावाची आत्मचरित्रात्मक कादंबरी आणि नाटक असे विपुल साहित्य लेखन त्यांनी केले. बाईची किमया झुलते दुनिया,कावेरी,पद्मा, कृष्णाकाठचा वारा, संध्या, उद्घाटन, अन्याय ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. त्यांनी एम.ए. इंग्लिश विषयातूनही पूर्ण केले. अण्णाभाऊंच्या समाजातला अण्णाभाऊंच्यानंतर इतका प्रदीर्घ लेखन करणारा, अण्णाभाऊंना पाहिलेला आणि अण्णाभाऊंची प्रेरणा घेतलेला असा हा लेखक होता. त्यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांचा विचार हेच होते. समाजामध्ये आधुनिक विचार रुजला पाहिजे आणि समाजातील ही टोकाची विषमता संपुष्टात आली पाहिजे, हेच स्वप्न त्यांनी बघितलं होतं. यासाठी त्यांनी लेखनाबरोबर प्रत्यक्ष चळवळीमध्ये ही सक्रिय योगदान दिले अण्णाभाऊ साठे यांच्या निधनानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मातंग समाज संघटनेच्या माध्यमातून एल.के. अवघडे यांच्यासारख्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या माध्यमातून प्रबोधनाला सुरुवात केली अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा समाजामध्ये रुजवण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले. नव्या कार्यकर्त्यांना ते सतत प्रोत्साहन देत. अज्ञान,दारिद्र्य आणि विषमतेच्या गर्तेत अडकलेल्या मातंग समाजाला फुले, शाहू,आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या विचार प्रवाहाकडे घेऊन जाण्यासाठी त्यांची धडपड होती.
2012 मध्ये सांगली येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या समतावादी साहित्य संमेलनात त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र अण्णा भाऊ साठे पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. आदर्श शिक्षक पुरस्काराने ही त्यांना गौरविण्यात आले होते.
गेले काही दिवस त्यांना भेटण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्यांना भेटण्याची मनोमन इच्छा होती. एकदा त्यांच्याबरोबर निवांत गप्पा माराव्यात असं वाटत होतं. कधीतरी फोनवरून त्यांच्या खुशालीची चौकशी करायचो पण अलीकडे त्यांच्या तब्येतीमुळे तेही बंद झालं होतं. काही दिवसांपूर्वी लिंगनूर या त्यांच्या गावी गेलो होतो. परंतु तेव्हा घरी समजल की,ते शिरोली मधील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. तसाच शिरोलीत गेलो .म्हटलं त्यांची भेट घेऊ पण ते आयसीयू मध्ये होते. तिथेही त्यांची भेट होऊ शकली नाही आणि काल त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांना भेटायचं राहून गेलं. त्यांची भेट होऊ शकली नाही सर नेहमीच राहील.
अण्णांच्या सारखा मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील पहिल्या पिढीचा बिनीचा शिलेदार आपल्यातून निघून गेला आहे याचं खूप दुःख होत आहे.त्यांच्या स्मृतींना आणि विचार कार्याला मी विनम्र वंदन करतो!💐🌹🙏🙏
प्रा. प्रकाश नाईक,
8378849595
Comments
Post a Comment