मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??
*मजी आमी कुठलं...,पाटंवाडीचं? * --------------------------------- कोल्हापूरच्या माणसांनी मराठी भाषेला एकाहून एक असे खास शब्द बहाल केलेले आहेत. कोल्हापूरच्या भाषेचा लहेजा खरंच वेगळाच असतो. इथली माणसं जशी मोकळी ढाकळी तशीच ती प्रेमळ आणि रांगडी. जे काळजात असतं ते बोलणारी. कोल्हापूरच्या संस्कृतीनं मराठी भाषेच्या समृद्धीत भर टाकली आहे. मराठी भाषेचे वैभव वाढविण्यामध्ये कोल्हापूर परिसराने मोठे योगदान दिले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये एक प्रश्नार्थक वाक्य नेहमी वापरले जाते आणि त्या वाक्याची चर्चा सगळीकडे आहे. म्हणजे जेव्हा आपली फिरकी घेतली जाते किंवा आपल्याला फसवलं जातं किंवा गंडवलं जातं, तेव्हा ती व्यक्ती असे म्हणते," मजी आम्ही कुठलं ?फुलेवाडीचं?" म्हणजे या प्रश्नार्थक वाक्यातून त्या व्यक्तीला असंच म्हणायचं असतं की, आम्हाला काही कळतच नाही का?आम्ही काय दुधखूळे आहोत का? अगदी अशाच धर्तीवर शाहुवाडी पन्हाळा मलकापूर पट्ट्यात असाच एक वाक्प्रचार रूढ झालेला आहे. या परिसरामध्ये लोकांना जर असं वाटलं की, आपल्याला फसवलं जातंय, गंडवलं जातंय तेव्हा ती या परिसरातील व्यक्ती लगेच म्हणते,"मजी आमी कुठलं?पाटंवाडीचं?" 'आम्ही कुठलं फुलेवाडीचं' या शब्द समूहा मध्ये जी फुलेवाडी आहे, ती कोल्हापूर पासून अगदी जवळ आहे. फुलेवाडी हे कोल्हापूरचे एक उपनगरच आहे.शहरालगतचे परंतु गावची खास ओळख जपणारे उपनगर म्हणजे फुलेवाडी .फुलेवाडी मला माहिती आहे.माझे काही मित्र नातलग फुलेवाडीत राहतात. परंतु शाहुवाडी पन्हाळा मलकापूर या पट्ट्यामध्ये जे वाक्य वापरले जाते की," मजी आम्ही कुठलं? पाटेवाडीचं?" ही पाटेवाडी नेमकी आहे कुठे, तिचा इतिहास काय, ती कशी आहे आहे याबद्दल मी अनभिज्ञ होतो .मला एक पाटेवाडी माहिती होती ती म्हणजे शाहूवाडी ते करंजफेण या रस्त्यावर पावडाईच्या अलिकडं असणारी. पाटेवाडी नावाचं हे एक छोटस खेडं आहे हे मला माहीत होतं पण मला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. माझ्या काही विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या तोंडून मी नेहमी ऐकायचो ते म्हणजे,"मजी आम्ही कुठलं? पाटंवाडीचं?"तेव्हा मग मी त्या पाटेवाडीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, पाटेवाडी म्हणजे एखाद्याला कमी लेखण्याचा, एखाद्याचे अवमूल्यन करण्याचा विषय नाही,उपरोधाने वापरण्याचा शब्द नाही तर पाटेवाडी हा अभिमानाने मिरवण्याचा आणि स्वातंत्र्य ,समता आणि बंधुभावासाठीच्या लढ्याची प्रेरणा घेण्याचा विषय आहे.मी पाटेवाडीला भेट दिली.पणुंद्रेपैकी एक वाडी असणारी ही पाटेवाडी.खोत ,जवंजाळ आणि पवारांच्या अवघ्या शंभर सव्वाशे घरांची आणि साधारण चारशे लोकसंख्या असणारी ही वाडी.या गावचा इतिहास ऐकल्यानंतर सगळ्यांची छाती गर्वाने फुलून यावी , अंगावर मूठभर मांस चढावं आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा त्या गावाच्या नावातून मिळावी असं गाव म्हणजे पाटेवाडी. साडेतीनशे वर्षापूर्वीचा छत्रपतींचा तेजस्वी आणि रोमांचकारी इतिहास आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्यातलंच एक सोनेरी पर्व म्हणजे पन्हाळगडाचा वेढा भेदून पावनखिंडीत झालेला रणसंग्राम. पन्हाळगडाचा वेढा भेदून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर गेले तो रोमांचकारी इतिहास आपल्याला माहिती आहे. पन्हाळगडाला सिद्दी जोहरचा वेढा पडला होता. मुंगीला आत बाहेर करण्यास वाव नव्हता. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीजोहरला संभ्रमित केलं. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी नावाच्या गावातील एक निष्ठावंत मावळा शिवा काशीदला प्रति शिवाजी बनवून सिद्दी जौहरच्या भेटीला पाठवलं आणि आपण बाजीप्रभू देशपांडे व इतर निवडक विश्वासू सहकार्यांसह विशाळगडा कडे रवाना झाले. अंधारी रात्र. मुसळधार पाऊस... अडचणी चा रस्ता.... अशा परिस्थितीत सुद्धा सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत पावन खिंडीपर्यंत आले.इकडे शिवा काशिदला वीरगती प्राप्त झाली. सिद्धीच्या फौजेने पाठलाग सुरू केला. त्या वेळी बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं ,"राजे,तुम्ही विशाळगडावर पोहोचा. तोपर्यंत ही खिंड मी लढवतो. शत्रूच्या एकाही माणसाला पुढं येऊ देत नाही.लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे." आणि बाजीप्रभुनी शब्द खरा करून दाखवला. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचत नाहीत आणि तिथल्या तीन तोफांचा आवाज कानी येत नाही, तोपर्यंत बाजी प्रभूंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ती खिंड लढवली. पराक्रमाची शर्थ केली. स्वतःचे बलिदान दिलं आणि घोडखिंड नावाची ती खिंड बाजीप्रभुंच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झाली. तीच ही पावनखिंड. पावनभूमी पावनखिंडीकडे पन्हाळ्याकडून येणारा रस्ता पाटेवाडीवरुनच जातो. *पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह याच मार्गावरून विशाळगडाकडे रवाना झाले .याच पाटेवाडीच्या मातीला शिवरायांच्या पावलांचा स्पर्श झाला. गावची माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली. त्यांच्या त्यागाचा, त्यांच्या पराक्रमाचा ,त्यांच्या शौर्याचा परिसस्पर्श या मातीला झाला. या मातीचं सोनं झालं. याच मातीमध्ये स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या रक्ताचे थेंब मिसळले. याच मातीने छत्रपती शिवरायांचा कर्तृत्वशाली इतिहास अभिमानाने मिरविला.तो शेकडो वर्षे जतन केला. शिवाजी महाराजांच्या क्रांतिकारी इतिहासाचा स्पर्श झालेली ही माती आहे .तळहातावर आपला प्राण घेऊन स्वराज्यासाठी निष्ठेने झुंजणाऱ्या झुंजार मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांनी इथल्या दर्या दुमदुमून गेलेल्या. तलवारीच्या खणखणाटांनी पराक्रमाचे,क्रांतीच्या संगीत लहरींना प्रसवणारी ही माती! त्यामुळे आजच्या तरुणांनी 'आमी कुठलं पाटंवाडीचं?' हा शब्दप्रयोग करत असताना किमान पाटेवाडी चा इतिहास तरी जाणून घेतला पाहिजेअसं मला स्वतःला वाटतं. भाषा अशाच प्रक्रियेतून अधिक विकसित होत असते. प्रगल्भ होत असते. भाषा प्रवाही असते, त्यामुळे भाषेचा प्रवाह समृद्ध होतो हे खरे आहे . *परंतु या परिसरातल्या तरुणांनी पाटेवाडीला जावं, तिथल्या मातीला स्पर्श करावा, त्या मातीचा इतिहास समजून घ्यावा आणि त्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी.* *आजच्या काळामध्ये शिवछत्रपतींच्या विचारांच्या बरोबर उलट जे काही सगळं सुरू आहे त्याच्या संदर्भात थोडसं चिंतन करावं, असं मला वाटतं. मी या गावाला भेट दिली.तिथला रोमांचकारी इतिहास समजून घेतला. पाटेवाडी चा इतिहास नव्या पिढीने समजून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने या लढाईला जी लढाई समतेची आहे ,जी लढाई अन्यायाविरुद्ध लढण्याची आहे, जी लढाई माता भगिनींचा आदर करणारी आहे, जी लढाई शोषितांचा आवाज बुलंद करणारी आहे ,अशा लढाईचं रणशिंग फुंकण्यासाठी खरंच आजच्या तरुणांनी पाटेवाडी ला नक्की जावं,आणि म्हणावं, *"आमी पाटंवाडीचं नसलो तरी पाटंवाडीची माती कपाळाला लावून आलोय.छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वारसा आम्ही पुढे चालवू.माणुसकी,न्याय आणि समतेसाठी विचारांची लढाई करु *प्रा.प्रकाश नाईक,सरुड* ८३७८८४९५९५ --------*----------*-
अतिशय छान sir ... खरा इतिहास समोर आणला...
ReplyDeleteThnks
DeleteKup sundar.
ReplyDeleteKhup bhari sir
DeleteVery nice great Though
Deleteमस्त छान लिहिलेला आहे
ReplyDeleteThnks
DeleteThnks
Deleteछान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete