*सब देखा लेकिन भाडळे नही देखा*
*सब देखा लेकिन भाडळे नही देखा* ------------------------------- ------------------- **प्रा.प्रकाश नाईक*,सरुडता.शाहूवाडी ८३७८८४९५९५ ------------- ---- --------------------------------- एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी जवळपास संपूर्ण भारतावर कब्जा घेतला होता. भारतातली बहुतांश संस्थाने आणि राज्ये त्यांनी जिंकली होती. ब्रिटिशांनी महसूल गोळा करण्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा लावली होती. भारतातील महसूल गोळा करण्याच्या संबंधित त्यांनी जे काही निर्णय घेतले किंवा त्यांनी जी काही नियोजन केले, त्याकडे आपल्याला वेगवेगळ्या अंगाने पाहता येते. सर्व खेड्यापाड्यांपर्यंत महसूल गोळा करण्याच्या विषयी त्यांची एक यंत्रणा होती. पण शाहूवाडी तालुक्यातील एक असे गाव होते की, त्या गावचा महसूल ब्रिटिश गोळा करत नव्हते. कारण हे गाव एका उंच अशा टेकडीवर वसलेले होते आणि त्या टेकडीच्या भोवती दाट जंगल झाडी होती. दात जंगलाने आच्छादलेला हा परिसर या गावाच्या चहुबाजूंना होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या महसूल गोळा करणाऱ्या यंत्रणेच्या नजरेतून हे गाव नेहमी सुटत असे किंवा ते लोक या गावापर्यंत पोहचत नसत. परंतु एकदा ही गोष्ट वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. करवीर इलाख्यामध्ये असणारे हे गाव. या गावाची नोंद महसूल यादी मध्ये आहे. परंतु त्या गावचा महसूल मात्र या ठिकाणी जमा होत नाही, ही काय भानगड आहे? असा प्रश्न त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना पडला. त्या यंत्रणेतल्या काही कर्मचाऱ्यांना त्यांनी बोलावून घेतले आणि त्यांना या विसंगती बद्दल जाब विचारला.कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की, जरी तुमच्या यादीला हे गाव असले तरी आम्ही मात्र हे गाव पाहिलेले नाही. *'सब देखा लेकीन भाडळे नही देखा'* हे गाव शाहूवाडी तालुक्यातील एक छोटंसं खेडं भाडळे.हजारभर लोकवस्तीचे. खुटाळवाडी आणि आवळी या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दोन गावांमध्ये उंच टेकडीवर वसलेले. महामार्गापासून टेकडीवर दीड दोन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.भाडळे हे गाव १६१० साली वसल्याची नोंद आढळते. हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संग्रामात अग्रेसर होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठीशीही भक्कमपणे भाडळे गाव उभे असल्याचीही माहिती मिळते. परंतु या गावाचा महसूल काही ब्रिटिशांना गोळा करता आला नाही आणि त्यातून एक वा क्य त्या वेळेला उच्चारण्यात आले, *'की सब देखा लेकीन भाडळे नही देखा'* अजुनही आमच्या शिराळा- शाहुवाडी -पन्हाळा या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि वारणाखोर्यामध्ये भाडळे या गावाविषयी *सब देखा लेकीन भाडळे नही देखा* असे बर्याचदा म्हटले जाते. भाडळ्याचा कुणी एखादा मित्र खूप दिवसानंतर भेटला तर त्याला म्हटलं जातं ,"तुम्ही भाडळ्याचं. तुम्ही आमाला दिसणार हायसा व्हय.सब देखा लेकिन भाडळं नही देखा' . तर हे वाक्य गमतीने उच्चारलं जातं.भाडळे हे गाव आमच्या सरुडपासून गावापासून अवघ्या दहा किलोमीटरवर .महाराष्ट्रातल्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये खूप ठिकाणी मी फिरलो आहे .महाराष्ट्राबाहेरही गेलो आहे .पण मी खरंच परवाच्या १८ आॕक्टोबरपर्यंत मी भाडळ्याला गेलो नव्हतो. माझे काही भाडळ्यातले मित्र आहेत. त्यांनी मला खूप आग्रह केला होता. परंतु माझं काही भाडळ्याला जाणं झालं नव्हतं.अर्थात 'सब देखा लेकीन भाडळे नही देखा' हे वाक्य मी लहान असल्यापासून आमच्या परिसरामध्ये ऐकत आलेलो आहे. त्यामुळे या वाक्याची उत्पत्ती नेमकी कशी झालेली आहे? आणि भाडळे हे गाव नेमके कसे आहे? याबद्दल माझ्या मनात उत्सुकता होतीच. परवा मी भाडळ्याला गेलो आणि तिथं माहिती घेतली .हे गाव बघितलं .तोपर्यंत मी सुद्धा असे म्हणत होतो की ,सब देखा लेकिन भाडळे नही देखा! *परंतु आता मी असे म्हणू शकतो की, मैने सब देखा है और भाडळे भी देखा है !या गावाबद्दल मला भाडळे गावचे सुपुत्र आणि शाहुवाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती मा. जयसिंगराव पाटील भाडळेकर अण्णा यांच्याकडून खूप रंजक अशाप्रकारची माहिती मिळाली. *१६१०मध्ये हे गाव वसलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संग्रामात या गावाचा मोठा वाटा होता. त्या गावातली बरीचशी पाटील मंडळी ही पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणार्या गावांमध्ये तेव्हा राहिली होती. त्यातले काहीजण इथे आले आणि इथेच राहिले. नंतरच्या काळामध्ये त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांना सुद्धा मोलाची साथ केलेली आहे. ऐतिहासिक वसा आणि वारसा असणारे गाव आहे. ब्रिटिशांना या गावांमध्ये काही महसूल गोळा करता आला नाही. १९५२ पासून या गावाचा महसूल सरकारकडे जायला लागला. आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर ही गोष्ट घडलेली आहे हे विशेषत्वाने नमूद करावं लागेल. या गावात १९०५ साली एक प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली .याच गावात शाळा सुरु करण्याचं कारण म्हणजे आवळी, बोरवडे आणि इकडं चरण ,थेरगाव यांच्या मध्यभागी असणारे हे गाव होतं. त्यामुळे भाडळे या ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आली . *विशेष म्हणजे या शाळेचे चौगले नावाचे एक विद्यार्थी बोरीवडे ता.पन्हाळा येथील होते.ते पुढे बॕरिस्टर झाले.* १९६६ पर्यंत हे गाव सुपात्रे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट होतं. *१९६६ मध्ये भाडळ्याला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली.तेव्हापासून १९९२ पर्यंत या गावचे सरपंच व पं .स. सदस्य म्हणून जयसिंगराव पाटील अण्णांनी काम पाहिलं. पुढे काही काळ ते सभापती होते. त्याचबरोबर मार्केट कमिटीवरही संचालक म्हणून त्यांनी काम केलं. तर तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणारा एक अभ्यासू आणि क्रियाशील कार्यकर्ता या गावानं शाहूवाडी तालुक्याला दिलेला आहे.गावात नंतरच्या काळात सोसायटी ,पाणीपुरवठा संस्था हे सगळं सुरू झालं .त्यात जयसिंगरावांनी पुढाकार होता. ग्रामीण भागाची माहिती असणारा,एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतलेला आणि काँग्रेसच्या विचारांनी काम करणारा कार्यकर्ता म्हणजे जयसिंगराव अण्णा. तालुक्यात सभापती म्हणून नेतृत्व करत असताना तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचं काम त्या काळामध्ये केलं.विशेषतः शाळा ,रस्ते ,पाणी, वीज आणि आरोग्य या बाबतीत यांच्या कार्यकाळात मध्ये झालेले काम हे महत्त्वाचं आहे. अण्णांनी मला सांगितलं की, जिथे शाहुवाडी- पन्हाळा या दोन तालुक्यांना जोडणारी खिंड आहे, ती खिंड भाडळ्याची खिंड म्हणून ओळखली जाते. त्या खिंडीतच एक पूर्वी पोलीस चौकी होती. *त्या पोलिस चौकी वरती स्वातंत्र्यसैनिकांनी, क्रांतिकारकांनी त्या काळामध्ये दगडफेक केली होती. बालवयात अण्णा सुद्धा त्या पोलिस चौकीवर दगड मारण्याच्या आंदोलनात सहभागी होते .एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव स्वातंत्र्यसंग्रात भूमिगतांना आणि क्रांतिकारकांना सहकार्य करणारं होतं. वारणेच्या पलीकडचा भाग दक्षिण सातारा जिल्ह्याचा भाग होता. या जिल्ह्यातील सर्व भुमिगत कार्यकर्ते ब्रिटिश पोलिसांच्या नजरा चुकवून नदीच्या अलीकडं शाहूवाडी तालुक्यात यायचे . भाडळे परिसरामध्ये मोठं जंगल होतं तिथे लपून बसायचे .अशावेळी त्या सर्व भूमिगत क्रांतिकारकांना सुरक्षित ठेवणं ,त्त्यांचे निरोप पोहचविणं, जेवण्याची व्यवस्था करणं हे सगळं काम हे गाव अतिशय आनंदाने करत असे. *म्हणजेच भाडळे या गावांने देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव ब्रिटिश अधिकार्यांनीही बघितलं नसावं हे खरं वाटत नाही. हे गाव त्या लोकांनी पाहिलं असावं परंतु हे महसूल गोळा करणारे जे काही त्यांचे कर्मचारी किंवा अधिकारी असतील ते जंगलाचा भाग आणि वर डोंगरावर असणारे गाव म्हणून या गावाकडे येत नसावेत आणि त्यामुळे तिथाला त्यांनी महसूल गोळा केला नसावा.आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर देत असताना त्यांनी असं म्हटलं असावां,'सब देखा लेकिन भाडळे नही देखा'. त्यामुळे ते वाक्य जनमानसामध्ये रुजले असावे,असे वाटते. तर असे हे भाडळे हे गाव मी परवा बघितले. *आता हे गाव सगळेजण बघायला येतील असे काहितरी चांगले घडविण्याची जबाबदारी निश्चितच इथल्या नव्या पिढीवर आहे.* -------------------
Lay bhari
ReplyDeleteThnk u
ReplyDeleteसर तुम्ही खुप छान लिखान करता अस वाटत नुसत वाचत जाव धन्यवाद अनमोल माहीती दिल्ली व तुमचा सहवास लाभलेला तुमचा वाचक
ReplyDeleteधन्यवाद ...!!आपली प्रतिक्रिया आनंददायी आहे!!
ReplyDeleteलहानपणापासून हे वाक्य ऐकत आलो आहे ,गमतीचा भाग म्हणजे कित्येक वेळा सदर वाक्य वापरातही आले आहे , पण खरा अर्थ आज गवसला ! धन्यवाद....
ReplyDeleteधन्यवाद ...!
Delete