बोरपाळं हाटेल

*बोरपाळं हाटेल*

     कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर
कोल्हापूर पासून साधारण वीस कि.मी.अंतरावर बोरपाडळे हाॕटेल नावाचा थांबा आहे.खरं तर बोरपाडळे गाव त्या थांब्यापासून दोन कि.मी.आत आहे.इथेच महार्गावरुन वारणानगरकडे जाण्यास फाटा फुटतो.हा तिठा बोरपाडळे हाॕटेल या नावाने प्रसिद्ध पावलेला आहे.या ठिकाणी कोणते हाॕटेल आहे की, ज्या नावाने हे ठिकाण ओळखले जाते,याबाबत उत्सुकता होती.माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर ते हाॕटेल माझा  मित्र अमर पाटील याच्या आजोबांनी १९४५ च्या सुमारास सुरु केल्याची माहिती मिळाली.
      बोरपाडळे या गावाची उच्चारसुलभता म्हणून बोरपाळं असाच उच्चार आमच्या परिसरात केला जातो.शाहूवाडी,पन्हाळा तालुक्यात *बोरपाळं हाटेल* या नावानं हे ठिकाण ओळखले जाते.या हाॕटेलचा इतिहास म्हणजे ग्रामीण भागातील एका माणसाच्या उद्यमशीलतेतून आकाराला आलेला आहे.
  *शंकर दत्तात्रय पाटील* हे मुळचे शाहूवाडी तालुक्यातले तळपवाडी या गावचे .बोरपाडळे या गावात ते घरजावई म्हणून आले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाता येणारा हा एकमेव मार्ग होता.या तिठ्यावरुन वारणेकडे जाणारा मार्ग पुढे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठारला मिळतो.त्यामुळे या ठिकाणचे महत्व शंकर पाटलांना उमगले.शेतीत मातीत राबण्यापलिकडे विचार करणे ज्या काळात चुकीचे मानले जात होते ,त्या काळात त्यांनी वेगळा विचार केला  महामार्गावरील त्या तिठ्यावर एका खोपटात छोटंसं हाॕटेल सुरु केलं.नांगरासोबत  चहाची किटली हातात  घेऊन त्यांनी वेगळा विचार केला.ज्या काळात हाॕटेलात जाणे म्हणजे चैन समजली जायची त्या काळात  त्यांनी या व्यायवसायाची निवड करणे विलक्षण गोष्ट होती.या  गोष्टीला पंचाहत्तर वर्षांचा काळ लोटला गेला आहे.चहा,चिवडा ,लाडू इथे मिळत असे.रत्नागिरीकडे जाणारे प्रवासी आवर्जून इथे चहासाठी थांबत.वन खात्याची एकचौकी वगळता इथे काहीही नव्हते.शंकर पाटलांनी चिकाटीने हे हाॕटेल चालवले.१९८४ पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत  त्यांनी हाॕटेल व्यवसाय केला.तोपर्यंत हा स्पाॕट चांगलाच विकसित झाला होता.वेगवेगळी दुकाने सुरु झाली होती.वाहनांची आणि लोकांची वर्दळ वाढली होती.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा *मोहन पाटील* यांनी हाच व्यवसाय पुढे सुरु ठेवला.दरम्यान थोडीफार सुधारणा केली आणि खोपटातून हे हाॕटेल पक्क्या भिंतीच्या खोलीत सुरु झाले .याही गोष्टीला चार दशके उलटली आहेत.तोपर्यंत हे ठिकाण बोरपाडळे हाॕटेल या नावाने प्रसिद्ध पावले होते.कारण त्यावेळी
या हाॕटेलशिवाय तिथे दुसरे काहीही नव्हते.
  आता *मोहन पाटील* यांच्यासोबत
त्यांचा मुलगा  *अरुण पाटील* हाॕटेल हा हाॕटेल सांभाळतो आहे.म्हणजेच तिसरी पिढी या व्यवसायात सक्रिय आहे.शेतीसोबत आजोबांनी सुरु केलेले हे हाॕटेल त्याच उद्यमशीलतेने अरुण चालवतो आहे.
     बोरपाडळे हाॕटेल हे ठिकाण याच हाॕटेलमुळे लोकांच्या ओठांवर आहे. बोरपाडळे तिठ्यावर  'हाॕटेल मोहन कॕफे'हा फलक दिसतो.ते हेच हाॕटेल.ज्या हाॕटेलमुळे हे ठिकाण बोरपाडळे हाॕटेल  म्हणून परिचित आहे.
   पुणे बेंगलोर महामार्गावरुन 
कोल्हापूर शहराकडेकडे वळताना तावडे हाॕटेल नावाचे ठिकाण आहे.पूर्वी तेथे हाॕटेल होते.आता तिथे हाॕटेल नाही परंतु तावडेहाॕटेल नावानेच ते ठिकाण प्रसिद्ध आहे.तिकडे तावडे हाॕटेल आणि इकडे बोरपाडळे हाॕटेल.शाहूवाडी,पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यात तर हे ठिकाण म्हणजे सर्वांच्या दृष्टीने बोरपाळं हाटेल.अजूनही या परिसरात एखाद्या एसटी बसमध्ये जुनी माणसं  कंडक्टरकडे *बोरपाळं हाटेल आर्दं* असंच तिकीट मागतात.हे नाव या परिसरातील लोकमानसात अगदी फिट्टं बसलं आहे.हे ठिकाण ज्या हाॕटेलच्या नावानं प्रसिद्ध झालंय त्याबद्दल माहिती घेण्याची उत्सुकता होती. माहितीचा स्त्रोत अर्थातच अमर पाटील हा हे हाॕटेल सुरु करणाऱ्या शंकर पाटील यांचा नातू.तो माझा काॕलेजचा मित्र.पंचाहत्तर वर्षापूर्वीच्या या हाॕटेलमध्ये बर्याचदा चहा ,नाष्टा झालाय.त्यासोबतच या जून्या हाॕटेलवर काही लिहल्याचं समाधान आहे.

*प्रा.प्रकाश नाईक*
 *८३७८८४९५९५*

Comments

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

आपकी याद आती रही रातभर