छ.शाहू महाराज,भास्करराव जाधव आणि आमचं सरुड
११मार्च १९१८ रोजी भास्करराव जाधव यांच्या हस्ते सरुडच्या(ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर ) सोसायटीचे उद्घाटन झाले होते.यानिमित्त राजर्षी शाहू महाराज ,भास्करराव जाधव आणि सरुडच्या संबंधांवर टाकलेला प्रकाशझोत!! *राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव आणि आमचं सरुड!* कोल्हापूर ही समतेची भूमी म्हणून ओळखली जाते ती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारकार्यामुळे. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी याच कोल्हापुरातून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण जगाला दिशा देणारा एक समतेचा विचार मांडला. अनेक दूरगामी परिणाम करणारे निर्णय अत्यंत द्रष्टेपणाने घेतले. त्या सनातनी धर्म व्यवस्थेच्या पेकटात लाथ घालण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय सुद्धा घेतले. छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकराजे होते. सामान्य जनतेप्रती त्यांची तळमळ ते सातत्याने व्यक्त करत राहिले .माणसांच्या दुःख वेदनांवर फुंकर घालण्यासाठी त्यांनी आपली राजसत्ता पणाला लावली. व्यवस्थेनं नाकारलेल्या अलक्षित समुदायांना माणूस म्हणून जगण्याची संधी देणारा हा राजा होता. अशा राजर्षी शाहू महारांजांच्या कोल्हापूर संस्थान चे १८९५पासून१९२० पर्यंत मुख्य महसूल अधिकारी म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत होते. भास्करराव जाधव म्हणजे बहुजन समाजाचे प्रज्ञावंत आणि व्यासंगी अशा प्रकारचे नेते होते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी ते निष्ठेने जोडले गेले होते. अस्पृश्यतानिवारण, शेतकऱ्यांचे शोषण,रयतेचा विकास याबाबतीत राजर्षी शाहू महाराज आणि भास्कर जाधव या दोघांचे एकमत होते.महात्मा ज्योतिबा फुले व कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचे विचार घेऊन भास्करराव जाधव हे वाटचाल करत होते. या विचारांमुळेच ते राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्यात सहभागी झाले. एक किस्सा सांगतो. आमच्या शाहूवाडी तालुक्यातील आणि आमच्या सरुड गावाच्या शेजारी एक किलोमीटरवर असणारे वडगाव हे गाव. याच गावातला पांडुरंग चिमणाजी पाटील नावाचा एक मुलगा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला.ही बातमी राजर्षी शाहू महाराजांना समजली. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून पांडुरंग चिमणाजी पाटील यांना बोलावून घेतलं आणि कोल्हापुरातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. बहुजन समाजातले मॅट्रिक पास झालेले हेच पांडूरंग पाटील पुढे मोठे कृषीशास्त्रज्ञ झाले.जागतिक पातळीवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे योगदान आपल्या नाकारून चालणार नाही. पांडुरंग चिमणाजी पाटील १९३५ ते ३७ या काळामध्ये आमच्या सरुड गावातल्या सोसायटीचे चेअरमन होते. आणि या ऐतिहासिक अशा सोसायटीचे उद्घाटन ११मार्च १९१८ रोजी राजर्षी शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी 'रामायणावर' एका नव्या दृष्टिकोनातून प्रकाशझोत टाकला आणि आपल्या विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा परिचय भारतीय विचार विश्वाला करून दिला, ते भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले .कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच समतेचे दीप उजळले क्रांतीच्या मशाली पेटल्या आणि विकासाची किरणं वाड्या-वस्त्यांवर गाव खेड्यापर्यंत जाऊन पोहोचली. हे श्रेय राजर्षी शाहू महाराजांचे आहे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पना आणि त्यांचा विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणाऱ्या भास्करराव विठोजीराव जाधव यांचे सुद्धा आहे.आमच्या गावाशी असलेला राजर्षी शाहू महाराज आणि भास्करराव विठोजीराव जाधव यांचा जो काही विचार बंध आहे तो आम्हाला निश्चितच अभिमानास्पद आहे.शाहू महाराज हयात असतानाच भास्करराव विठोजीराव जाधव यांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सेवा संस्था सोसायटी उभारण्यात आल्या होत्या. या सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, त्यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतीसासाठी आर्थिक मदत करावी आणि या माध्यमातून शेती धंदा फायद्यात यावा या उद्देशातून या सोसायट्यांची स्थापना करण्यात येत होती. एकूणच या संस्थांच्या स्थापनेमागे शेतकरी सावकारी पाशातून मुक्त व्हावा , तो अधिक मजबूत व्हावा ही भावना होती. म्हणून भास्करराव जाधव यांच्या पुढाकारानेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोसायट्यांची स्थापना झाली . ११ मार्च १९१८ रोजी सरुड ग्राम विकास संस्था या नावाने ही सोसायटी स्थापन झाली होती.स्वातंत्र्योत्तर काळात ही संस्था हनुमान विकास सेवा संस्था म्हणून नावारुपाला आली. महंमद बाबा अत्तार,का.के.स्वामी, शमशुद्दीन मुल्लाणी आणि त्यांचे सहकारी यांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. ही मंडळी स्वातंत्र्य सैनिक होती. देशभक्तीने प्रेरित झालेल्या आणि देशप्रेमाने भारलेल्या तरुणांनी एकत्र येऊन या संस्थेच्या उभारणीमध्ये काम केलं आणि संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून या परिसरातल्या शेतकऱ्यांचा विकास झाला. शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली परंतु या संस्थेची आणि या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांची एक नाळ जोडली गेलेली आहे .१९४८ पासून नामदेवराव शंकरराव पाटील तथा अण्णा यांनी या संस्थेची धुरा हातात घेतली आणि तिथून पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे ही संस्था चालवून दाखवली. विशेष म्हणजे रावबहाद्दूर पांडूरंग चिमणाजी पाटील यांनी जसे या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले तसेच माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर दादा यांचे वडील आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आबा यांचे आजोबा यशवंतराव दौलतराव पाटील यांनीसुद्धा १९५२ते ५३ या काळामध्ये या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळल्याचा इतिहास आहे. शेतकऱ्यांची खाजगी सावकारांच्या जोखडातून मुक्तता व्हावी, त्यांचं शोषण थांबावे,जून्या तगाई पद्धतीतून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे व शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत याकरिता राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून आणि भास्कर जाधव यांच्या पुढाकारातून अशा संस्था संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आल्या. यातली एक संस्था आमच्या सरुडमध्ये भास्करराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होऊन स्थापन झाली होती हा अतिशय महत्वाचा भाग आहे.तो आमच्या गावच्यादृष्टीने भूषणावह व अभिमानास्पद आहे. १९१८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम करण्याचे जाणीवपूर्वक टाळले गेले. याबाबत संस्थेकडून अशी माहीती मिळाली की ,सध्या संस्था ही तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करत आहे . अशा समारंभावर खर्च करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आणखी काही चांगल्या सुविधा देता येतील हे त्यांनी पाहिले .यातून हे स्पष्ट होते की, राजर्षी शाहू महाराजांचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उत्थानाचा विचार होता. त्या विचारांचा वारसा या संस्थेने अद्यापही सोडलेला नाही . शाहू महाराज किती दूरदृष्टी ठेवून विचार मांडत होते आणि शंभर वर्षानंतर सुद्धा याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते असतात तेव्हा तो शाहू महाराजांच्या विचारांचा विजय असतो, असं मला वाटतं .शाहू महाराजांचा आणि भास्कररराव जाधव यांचा जो काही सरुडशी संबंध आला तो निश्चितपणे अभिमानाने मिरवण्यासारखा आहे. *प्रा.प्रकाश नाईक,सरुड* ८३७८८४९५९५
छान माहिती
ReplyDeleteThnk u
Deleteखुप छान माहिती, हा इतिहास माहिती नव्हता, तो आज समजला..
ReplyDeleteखुप छान माहिती, हा इतिहास माहिती नव्हता, तो आज समजला..
ReplyDeleteThnk,u
ReplyDeleteखूप दिवसांनी काही तरी वेगळं सांगायला सुरुवात केली आणि उत्तम व छान वाटले
ReplyDeleteधन्यवाद!!आपली ओळख??
Deleteधन्यवाद!!आपली ओळख??
Delete