साहित्यप्रेमी खा.राजीव सातवसाहेब

*साहित्यप्रेमी खा.राजीव सातव*                             काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ,राज्यसभा सदस्य खासदार राजीवजी सातव यांचं काल निधन झालं. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून ते  पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात होते. त्यांच्या प्रकृतीत  सुधारणा झाली असे सांगण्यात येत होते.परंतु काल अचानक त्यांची तब्येत खूपच खालावली आणि त्यांची  प्राणज्योत मालवली. काँग्रेसचा एक अभ्यासू, विचारी, सुसंस्कृत आणि तरुण चेहरा म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होतं. काँग्रेस  पक्षामध्ये हायकमांडशी जुळवून घेणारे आणि नेतृत्वाची हांजी हांजी करणारे अनेक लोक असतील परंतु खासदार राजीव सातवयांचा पिंड आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. गांधी घराण्याशी ते नक्कीच निष्ठा ठेवून होते परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता          आणि     जनसामान्यांबद्दलची अपार कणव  यावरही  निष्ठा होती. आणि  याच निष्ठेतून ते  राजकारणामध्ये काम करत होते.काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होई.गुजरात मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी होती.त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कामाची चुणूक दाखविली होती. महाराष्ट्रातील हिंगोली लोकसभा मतदार संघातून २०१४मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते. खरं  तर राजकारणाचा वारसा त्यांच्या घरामध्ये होता. पण तरीसुद्धा केवळ वारसाहक्काने ते राजकारण करत नव्हते तर त्यांची राजकारणाकडे बघण्याची एक व्यापक दृष्टी होती. त्यांचे काही स्वतंत्र विचार होते आणि त्यांची एक वेगळी कार्यशैली होती. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण झालेली होती. गुजरात मध्ये पक्ष कार्यासाठी गेले असताना  सूड भावनेतून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती ,लाठिचार्ज झाला होता.हे सर्व घडत असताना त्यांनी  नेहमीच लोकशाहीच्या  संवर्धनाची भूमिका घेतली होती आणि त्यासाठीच ते कार्यरत होते. आज सकाळपासून समाज माध्यमांवर त्यांच्या बद्दलच्या खूप सार्‍या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये त्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी, पत्रकारांनी त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. लोकशाहीवरची  निष्ठा हा त्यांचा गुण सर्वांनीच अधोरेखित केलेला आहे. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या विघटनवादी शक्तींना रोखलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका खूप जणांनी मांडली आहे. अत्यंत नम्र, मृदू आणि ऋजू अशाप्रकारचा त्यांचा स्वभाव होता .त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून नेहमी एक सुसंस्कृत व्यक्तीचे दर्शन घडत असे.   त्यांचं कॉलेजचं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालेलं होतं. बाॕटनी हा त्यांचा विषय होता. परंतु तरीसुद्धा  साहित्य, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा . त्यांचे मित्र , ख्यातनाम समीक्षक मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.अनिल सपकाळ यांनी सातव साहेबांच्या बद्दल काही माहिती दिली. त्यातून सातव साहेबांच्या आणखी एका पैलूचे दर्शन घडलं . सातव साहेब अत्यंत संवेदनशील आणि प्रगल्भ होते.संवेदनशीलता व विचारातील प्रगल्भता त्यांच्यात साहित्य वाचनातून आलेली होती. त्यांना वाचन करायला खूप आवडायचं.डाॕ. अनिल सपकाळ आणि राजीव सातव साहेब हे  फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये असताना 'भलरी' नावाचा एक विशेषांक काढायचे.की जो विशेषांक पुढे सात आठ वर्षे निघत राहिला. विशेष म्हणजे खा.राजीव सातव साहेब या अंकाचे निर्मिती प्रमुख म्हणून काम करायचे. अंक वाचायचे आणि तो अंक सगळीकडे कसा पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करायचे.काही विधायक काम करत असताना आपल्याला काही वेळा विविध क्षेत्रात हस्तक्षेपाची भूमिका घेणे आवश्यक असते.असे त्यांना वाटायचे. विशेष म्हणजे' भलरी'चा हा अंक तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख यांनाही ते दाखवायचे. म्हणजे राजकारण करायचे हे जरी त्यांनी निश्चित केले असले तरी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत राहणं, माणसं जोडत राहणं हा  त्यांचा गुण महत्त्वाचा होता.'भलरी' सारखा साहित्य क्षेत्रातील उपक्रम यशस्वी व्हावा ही त्यांची धडपड खूप काही सांगून जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातव साहेब उत्साहाने भाग घ्यायचे.लैंगिकता,प्रसारमाध्यमे,दंगली अशा विविध विषयावर  'भलरी' चे अंक निघायचे.याचा अर्थ राजीव सातव  साहेब हे पारंपरिक राजकारण करणारे राजकारणी नव्हते तर साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात भारतीय राजकारणा मध्ये काही नवे घडले पाहिजे, युवकांचा सहभाग वाढला पाहिजे ,त्यांची विचारशक्ती विकसित झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे लोकशाहीचे संवर्धन झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते घेऊन काम करायचे.साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राविषयी त्यांना कमालीची आस्था होती.साहित्यावर प्रेम करणारा,या देशाच्या एकात्मतेची वीण विस्कटू नये म्हणून धडपडणारा,अभावग्रस्तांच्या बाजूने उभारणारा एक संवेदनशील वृत्तीचा  राजकारणी आपल्यातून निघून गेला आहे.  खासदार राजीव सातव यांची पोकळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला नेहमीच जाणवणार आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीवर अपार निष्ठा असणाऱ्यांना आणि देशाच्या एकतेला तडा जाऊ नये असे वाटणाऱ्यांना त्यांचे अचानक जाणे नेहमीच सलत राहील यात शंका नाही. खा.राजीव सातवसाहेबांना विनम्र आदरांजली!!                                         *प्रा.प्रकाश नाईक*                                             श्री.शिव-शाहू महाविद्यालय,  सरुड,ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर .८३७८८४९५९५

Comments

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

आपकी याद आती रही रातभर