अण्णा,डोक्यात अंधार असला की,बाहेरचा उजेड कसा दिसणार?
*अण्णा, डोक्यात अंधार असला की, बाहेरचा उजेड कसा दिसणार?* अण्णा हजारे नावाच्या व्यक्तीने मंदिरे उघडण्याची सरकारकडे मागणी केली आहे, असे वृत्त माझ्या वाचनात आले.प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहेच.पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी असेही म्हटले आहे की ,मंदिर उघडली पाहिजेत आणि त्यासाठी मी आंदोलन करणार आहे. शाळा उघडण्याची काही गरज नाही कारण शाळेत जाऊन तसेही शिक्षक काय उजेड पाडतात? असा अण्णांनी प्रश्न केला आहे. या वाक्याचा मी भारतीय नागरिक म्हणून तीव्र निषेध करतो. कारण अण्णा हजारे यांच्यासारख्या माध्यमांनी मोठ्या केलेल्या एका माणसाने असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे निषेधार्ह आहे. त्याचबरोबर शिक्षकांवर अविश्वास दाखवणारे आहे. शिक्षकांचा अवमान करणारे आहे. खरंतर अण्णा हजारे यांच्या भूमिकांबद्दल आणि त्या भूमिकांमधील दुटप्पीपणाबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. गेल्या वीस पंचवीस वर्षाचा त्यांचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर अण्णा हजारे हे किती दुटप्पी, ढोंगी आहेत ,हे आपल्या लक्षात येतंच . त्यांची इमेज त्यांच्या भोवती असणाऱ्या खुषमस्कर्यांनी दुसरा गांधी अशी केली होती. गांधी होंणं इतकं सोपं असतं का? गांधी होण्यासाठी विचारांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता खूप महत्त्वाची असते.त्यासाठी अहंकार सोडावा लागतो. गांधींच्यावाटेवरून चालण्याची ती पूर्वअट असते. परंतु दुसरा गांधी असे म्हणवून घेणाऱ्या अण्णा हजारे नी आपल्या भूमिका वारंवार बदलल्या. हम करे सो कायदा अशी भूमिका घेतली. ग्रामसभेला अधिकार देऊन लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्याची भूमिका मांडत असताना आपण म्हणू तेच खरं आपण म्हणू तेच भ्रष्टाचारी आणि आपण म्हणून तेच भ्रष्टाचारविरहीत चारित्र्य संपन्न, अशी अत्यंत ढोंगी आणि चुकीची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसते. म्हणजे एका बाजूला जनलोकपाल यासाठी देशभर आंदोलनाचं रणकंदन माजवणारे अण्णा हजारे एका विशिष्ट विचारसरणीला सत्तेवर आणण्याचं काम करतात आणि दुसऱ्या बाजूला असे लोक सत्तेवर आल्यानंतर जनसामान्यांचे भरडणं सुरू असताना त्याच्यावर मात्र चुप्पी साधत अघोषित मौनात जातात. हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे? २०१४पूर्वी अण्णा हजारे यांनी फार मोठं आंदोलन केलं. त्याला मीडियानं हवा दिली आणि आंदोलनाची व्याप्ती देशभर गेली. परंतु नंतर काय झालं ?त्यांनी आपल्या भूमिका लवचिक केल्या की, सोयीस्करपणे नव्या सरकारच्या गलथान आणि जनता विरोधी कारभाराकडे दुर्लक्ष केलं? या प्रश्नांची उत्तर मी सांगायची गरज नाही. म्हणजे आज पेट्रोल डिझेलचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत .शेतकरी अडचणीत आहे .संविधान धोक्यात आलेलं आहे. अशा काळात लोकशाहीवर अधिकारवाणीने बोलणारे अण्णा काहीच बोलत नाहीत तेव्हा त्यांच्याबद्दलचा संशय वाढल्याशिवाय राहत नाही, आता तर त्यांनी कहरच केला .कोरोना सारखी जीवघेणी महामारी या देशांमध्ये आणि जगामध्ये आली. खूप लोकांना त्याचा फटका बसला. या काळामध्ये नियम शिथिल करून आपल्याला जनजीवन कसे सुरळीत करता येईल या संदर्भामध्ये अण्णां सारख्या माणसानं बोलणं आवश्यक होतं. परंतु काही केलं तरी मंदिरे उघडा नाहीतर त्यासाठी मी आंदोलन करेन. असा इशारा देताना, शाळा उघडल्या नाही तरी चालेल, नाही तरी शिक्षक तिथे जाऊन कोणता उजेड पडतात? अशी अत्यंत बेजबाबदार आणि शिक्षकांचा अवमान करणारी मुक्ताफळं अण्णांनी उधळलेली आहेत.शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एकूणच शिक्षण व्यवस्थेची तपासणी केली पाहिजे. परंतु आपल्याकडचे शिक्षक शाळेत जातात. मुलांना शिकवतात.तुटपूंज्या साधनांनी मुलांना घडवण्याचे प्रयत्न करतात .त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात .काही शिक्षक नोकरीत नियमित नाहीत.त्यांना पगार नाहीत तरी ते प्रामाणिकपणे काम करतात.विद्यार्ज्ञाथ्यांना ज्ञान देतात.ज्ञान म्हणजे प्रकाश.. उजेड..! आणि हा उजेड पेरण्याचे काम शिक्षक करत असतात. नव्या पिढीच्या विचारांमध्ये विवेकाचा, ज्ञानाचा, सद्विचारांचा प्रकाश पेरण्याचं काम ही शिक्षक मंडळी करत असतात . अण्णा या विषयावर बोलत नाहीत. जिथे प्रसिद्धी मिळते तिथंच अण्णा बोलत असतात. म्हणजेच शिक्षण हे अण्णांना महत्त्वाचं वाटत नाही. मुलं शिकली नाही तरी चालतील, मुलांनी शिकणे एवढं काय महत्त्वाचा आहे का? त्यापेक्षा मंदिरे उघडली तर लोकांना मोक्ष मिळेल, लोकांना देवाचे दर्शन घेता येईल आणि या देशाचं चांगलं चालेल असंच काहीसं अण्णांना म्हणायचं आहे. याचा अर्थ सरळ आहे .शिक्षणातून माणूस संस्कारी ,विचारी बनतो. सद्वर्तनी बनतो. सजग आणि विवेकी बनतो. विज्ञाननिष्ठ बनतो. अण्णाना हे नको आहे. त्यापेक्षा मंदिरे उघडली तर माणूस दैववादी बनतो. जरूर माणसाच्या श्रद्धा असतात आणि संविधानाने प्रत्येकाला आपल्या श्रद्धांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे .परंतु मंदिरातून जे साधणार नाही ते नक्कीच शाळेतून साधणार आहे. हा या जगाचा इतिहास आहे. म्हणजेच ज्ञानाच्या वाटेवरून चालण्यासाठी अण्णांचा विरोध दिसतो आहे. यावरुन अण्णा कुठल्या कंपुतले आहेत हे उघड होतं .आज पर्यंत ज्ञानाला कोणी विरोध केला? शिक्षणाला कोणी विरोध केला? याचा तपास केला तर अण्णा हे कुठल्या विचारपक्षातले आहेत हे स्पष्ट होतं. *ज्यांच्या डोक्यात अंधार आहे त्यांना ज्ञानाचा उजेड कसा दिसणार?* मग शी मंडळी, नाहीतरी शाळेत शिक्षक काय उजेड पाडतात? असाच प्रश्न करणार. आपल्याला फुले-शाहू-आंबेडकर कर्मवीर अण्णांच्या प्रकाशवाटेवरुन जायचं आहे. अण्णांसारख्या गांधींजींचा मुखवटा धारण करणाऱ्यांची दखल घेण्याची गरज नाही.आपण आपलं काम करत राहू.मंदिरांपेक्षा ज्ञानमंदिरांची चळवळ गतीमान करु! *प्रा.प्रकाश नाईक,सरुड* *८३७८८४९५९५*
Khup chaan mahiti sir
ReplyDelete