*पऱ्या*

                                         माझं बालपण सरंद या संगमेश्वर तालुक्यातील  ठिकाणी गेलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या बालपणीच्या आठवणी म्हणजे मोरपिसा सारख्या असतात. बालपणीच्या या  आठवणी म्हणजे खरंच मधाच्या पोळ्यासारख्या असतात. आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड हे असलं तरी माझे पप्पा कामाच्या निमित्तानं संगमेश्वर तालुक्यातल्या सरंद या ठिकाणी स्थायिक झालेले. माझा जन्म सरंदेत झाला नाही पण  सगळं बालपण मात्र इथंच गेलं. इथल्या असंख्य आठवणी मनात रुंजी घालतात.आम्ही जिथे रहायचो  ते ठिकाण एका ओढ्याच्या काठावर होतं. आता त्या मोठ्या ओढ्याला तिथल्या बोलीभाषेमध्ये पऱ्या  असं म्हटलं जायचं. पऱ्या म्हणजे एक  ओढा . डोंगर कपारीतून वाहणारे असंख्य छोटे-मोठे ओढे-नाले या  पऱ्याला मिळायचे आणि त्या सगळ्या ओढ्यांना नाल्यांना आपल्या पोटात सामावून तो पऱ्या गड नदीच्या दिशेने सुसाट वेगाने वाहत राहायचा.वयाची चाळीशी गाठल्यावर मन जेव्हा भूतकाळात शिरतं तेव्हा त्या पऱ्याच्या अनेकविध आठवणी पऱ्यातल्या एखाद्या डोहातल्या माशांनं पाण्यावरती  सुळकी मारावी ,तशा वर येत आहेत.                                       उन्हाळी सुट्ट्या संपायच्या.पावसाचे वेध लागायचे. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झालेली असायची.भाजावळ झालेली असायची.चोंडे तयार करुन झालेले असायचे. आणि मग सगळे शेतकरी पावसाची वाट बघत राहायचे.आगोटची सगळी तयारी व्हायची. राखण्याच्या  कोंबड्यांच्या मानेवरुन सुर्या फिरायच्या..वडे मटणाच्या पंगती उठायच्या.पाऊस सुरू व्हायचा. आता तो कोकणातला पाऊस! असा जोरात यायचा की, थांबायचाचं नाही. आणि अगदी कोरडा ठणठणीत असलेला पऱ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये  तुडुंब भरून अगदी वेगाने वाहत राहायचा. मग त्या पऱ्या ची एक अनामिक भीती सुद्धा वाटायची. कारण पाणी वाढायचं. एवढं वाटायचं की ,ते पात्रा बाहेर पडायचं आणि कधी कधी ते  अगदी आमच्या  अंगणात सुद्धा यायचं. काही तासांपूर्वी कोरडा ठणठणीत असलेला हा पऱ्या आपल्या आपल्या पोटातलं गढूळ पाणी तेवढ्याच वेगाने  खळखळाट करत गड नदीकडे घेऊन जायचा. थोडा पाऊस उघडला की, लगेच पाणी उतरायचं .पाणी कमी व्हायचं. हे पावसाचे चार महिने असंच चालायचं. याचदरम्यान लावणीसाठी, बेनणीसाठी गेलेली माणसं पुन्हा परत येऊन   अंगाला,हाता-पायाला लागलेला चिखल  पऱ्या वरच धुवून काढायची.बैलांना धुवायचं,नांगर आणि इतर अवजारं धुवून आपल्या घरी जायचं हा तिथल्या माणसांचा शिरस्ता होता. म्हणजे तिथल्या त्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं आणि त्या पऱ्या  एक अतूट असं भावनिक नातं होतं. त्या पऱ्याच्या काठालाच एक दगडांनी बांधुन घेतलेली खोल विहीर होती.सकाळी तिथं पाणी भरायला गर्दी असायची.ती सकाळची वेळ म्हणजे    पऱ्याला आणि विहीरीला  साक्षी ठेऊन  मनातल्या खोल भावनांची आणि काळजातल्या दुःखाची ओल एकमेकींना सांगण्याची असायची.विहीरीच्या एका बाजूला भांडी घासली जायची.काडण्यांचा खडखडाट व्हायचा.डोक्यावर दोन हंडे,कडेवर एक हंडा घेऊन तोल सांभाळत सांभाळत चढणीला चालणाऱ्या  बायकांचं ते चित्र डोळ्यासमोर आताही लख्ख उभं राहतं. आमच्याकडे तेव्हा दोन म्हशी होत्या. आणि त्यांना शाळा सुटल्यानंतर चरवण्याची  जबाबदारी माझ्याकडे असायची. काही वेळा काय व्हायचं की, म्हशी पऱ्यात शिरायच्या. मनसोक्त डुंबायच्या. त्यांना मला काही  बाहेर आणता यायचं नाही. कधी कधी तर त्या   पऱ्या पार  करून पलिकडच्या भाताच्या शेतात जायच्या. मला प्रचंड भीती वाटायची. कारण त्या एवढ्या पाण्यातून मी पलीकडे जाणं शक्य नव्हतं. म्हणून माखजन आणि सरंदेला  जोडणाऱ्या पऱ्यावरच्या पुलावरून मी तिकडे फिरून जायचो आणि मग म्हशींना पुन्हा या बाजूला काढायचो. एकदा काय झालं म्हशी पऱ्यात शिरल्या आणि काही केल्या त्या बाहेर निघेनात. त्यांना बोलवून झालं, ओरडून झालं ,त्यांना दगड मारून झाले .त्या दोघींचा काय मूड होता मला माहित नाही.पण त्या काही परत आल्या नाहीत.तर त्या चक्क   पऱ्या   पार करून पलीकडच्या शेतात गेल्या. मी ही धाडस करून त्या दुसऱ्यांच्या भात शेतात जाऊ नयेत म्हणून त्याच पाण्यातून पलीकडे जायला लागलो. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता. मला अंदाज आला नाही आणि मी अक्षरशः वाहत गेलो .नाकातोंडात पाणी गेलं.थोड्या अंतरावर लव्हाळ्याचं झुडूप माझ्या हातात आलं आणि मी त्याला पकडून धरलं. रस्त्यावरुन जाणाऱ्या बौद्धवाडीतल्या बायकांनी आरडाओरडा केला.काही  माणसं आली आणि त्यांनी मला बाहेर काढलं.   याच दिवसांमध्ये काही माणसं गळ टाकून याच पऱ्यातले मासे धरायची. कधी खेकड्याला जायची. गळाला काडू लावायचा आणि गळ टाकून बसायचे. खूप मासे यांना सापडायचे. हे दृश्य बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये पऱ्याच्या काठाला दिसायचं. तिथे राहणारे घोरपी लोक सुद्धा याच पऱ्यामध्ये मासे धरताना वारंवार दिसायचे .कधीकधी रात्रीच्या वेळी सुद्धा बत्त्या घेऊन मासेमारी व्हायची. थोडा पाऊस कमी यायचा.भात चांगलं पोसवायचं आणि त्या पोसवलेल्या भाताचा एक बेधुंद करणारा गंध श्वासात भरून घ्यावासा वाटायचा. मग आली आली म्हणत सुगी यायची .भात कापणी व्हायची. ते भात 'आडवी' घालून रचून ठेवलं जायचं आणि नंतर सवडीने झोडलं जायचं.  नव्याच्या पौर्णिमेला भाताच्या, नाचणीच्या, वरीच्या लोंब्या आणि आंब्याची पानं, झेंडूची फुलं यांचा तोरण करून चौकटीला बांधलं जायचं. आता पाऊस कमी व्हायचा.पण पऱ्यात पाणी असायचं. पर्‍याच्या पाण्याचा वेग थोडासा कमी झालेला असायचा .आता सलग प्रवाह नसायचा  तर काही ठिकाणी डोह तयार झालेले असायचे. या डोहात आजूबाजूची  गुरं पाणी प्यायची.मुलं डुंबत रहायची. आणखी काही दिवस जायचे.दिवाळी येऊन जायची. वातावरणातला तप्तपणा वाढत जायचा आणि मग पाण्याची थोडीशी टंचाई भासू लागायची.  अशा वेळेला त्याच्या काठावर असणाऱ्या वेगवेगळ्या वाड्यांतली लोकं आपापल्या वाडी जवळच्या भागात पऱ्यातच डुरा खणायची.हे  एक सामूहिक काम असायचं. फावडी, पहार आणि घमेली  घेऊन श्रमदान करायचे. डुरा खणून दगड रचून नीट बांधून घ्यायचा आणि त्यातलं पाणी मग खर्चाला, गुरांना, कपड्यासाठी वगैरे वापरलं जायचं .लोक सामूहिक श्रमदानाने त्याच्यावरती एक बंधारा घालायचे. ज्यावेळेला बंधारा घालण्याचं काम असेल त्यावेळेला पर्‍या पुन्हा माणसांच्या आवाजांनी गजबजून जायचा. फावड्यांचा ,पहारीचा खणखणाट व्हायचा आणि एका दिवसांमध्ये एक छोटेसे धरण  उभं राहायचं. त्या बंधाऱ्यामध्ये पुन्हा पाणी साठायचं आता पाणी खूपच कमी झालेलं असायचं .या काळामध्ये मासे धरण्याचं वेगळं तंत्र वापरलं जायचं. त्या पाण्यामध्ये पाट काढले जायचे . पाटात पाणी आल्यानंतर वरून पाणी अडवायचे आणि खाली 'ईन' लावायची आणि मासे धरायचे.पऱ्या च्या काठावर आमचं क्रिकेटचे ग्राउंड असायचं. आणि षटकार मारला की बाॕल सरळ पऱ्यातच!. तो पऱ्यावरचा पूल होता त्या पुलावर जाऊन संध्याकाळच्या वेळेला थांबणं आमच्यासाठी खास असायचं.        पूलावरच्या बाजूला असणाऱ्या वडापावच्या गाडीवरुन वडापाव घ्यायचा .तिथे वडापाव खायचा आणि मित्रांसोबत पुलावर गप्पा मारायच्या. सहज कोणी विचारलं, कुठे निघालास? तर ,'पुलावरून येतो 'असंच उत्तर दिलं जायचं .म्हणजे पऱ्या वरचा पूल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा तिथल्या सगळ्या लोकांच्या भावविश्वामध्ये स्थान असणाराच होता.                  मार्च यायचा उन्हाच्या झळा घेऊन.पऱ्या आता  पूर्णपणे आटलेला असायचा. कोरडा ठणठणीत झालेला असायचा. भाजावळ  सुरू झालेली असायची. ते धुराचे लोट आणि वातावरणाची तप्तता ,अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा अशाच काळात लग्नाचा हंगाम सुरू व्हायचा. ताशांच्या कडकडाटात कुठलंतरी वऱ्हाड नवरीला घेऊन लग्नासाठी निघालेलं असायचं.  पुलावर वऱ्हाड आलं की एखादा जाणता माणूस खाली उतरायचा नारळ फोडायचा आणि त्या पुलावर टाकून पुढे जायचा .ताशांचा आवाज आला की,  आमचे मित्र -आम्ही त्या पुलावर नारळ उचलण्यासाठी पळत सुटायचो.त्या नारळासाठी आमची काय तारांबळ व्हायची!      पऱ्याच्या काठावरच  स्मशानभूमी होती.तिथेच चिता पेटायच्या आणि आगीचा लोळ आकाशाकडे झेपावायचा.दुःखाचा एक आर्त स्वर वातावरणात मिसळुन जायचा.पावसाळा संपल्यानंतर  पाणी  कमी व्हायचं तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या बायका कपडे धुवायला यायच्या. आणि मग त्या तिथल्या दगडांवर रंगीबेरंगी कपडे वाळत घातले जायचे. ते दृश्य तर एक वेगळंच असायचं. आता खूप दिवस सरंदेला जाणं झालेलं नाही.आठवणी तो काळ पुन्हा जिवंत करतायत.पुन्हा सरंदेला जावं म्हणतोय..पऱ्याच्या काठाने फिरावं आणि डोहात डुंबावं म्हणतोय....ते हरवलेले दिवस पुन्हा शोधावं म्हणतोय...!!                                   *प्रा. प्रकाश नाईक*                                       ८३७८८४९५९५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

आपकी याद आती रही रातभर