मिस यू एनडी सर!
*मिस यू एनडी सर!* साधारणतः बारा-तेरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे .कोल्हापूर शहरामध्ये काही सनातनी विचारांच्या मंडळींनी यज्ञ करण्याचं ठरवलं. हा यज्ञ विश्वशांतीसाठी आहे असं संयोजकांकडून सांगण्यात आलं होतं. या यज्ञामध्ये शेकडो लिटर तूप, तेल आणि खाद्यपदार्थांची आहुती दिली जाणार होती. कोल्हापूर खरंतर शाहूंची नगरी आहे. शाहूंच्या विचारांची नगरी आहे. एका बाजूला सगळा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आणि इथला शेतकरी अडचणीत असताना आपण अशा प्रकारची अन्नाची नासाडी करून अवैज्ञानिक आणि अविवेकी अशा प्रकारचा यज्ञ करणं, हे काही बरोबर नाही असं कोल्हापुरातल्या काही मंडळींचं म्हणणं होतं. परंतु यज्ञाचे संयोजक इरेला पेटले होते .यज्ञ करणं हे आमचं स्वातंत्र्य आहे, असे म्हणून त्यांनी यज्ञ करणारच अशी भूमिका घेतली होती. दुसऱ्या बाजूला जनमत मात्र यज्ञाच्या विरोधात एकवटत होतं. आणि कोल्हापुरातल्या सर्वच परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांच्या संस्था संघटनांनी या यज्ञाला प्रचंड मोठा विरोध केलेला होता. शेवटी या यज्ञाच्या विरोधात मोर्चा काढण्यात ठरलं. त्या मोर्चाचे नेतृत्व करत होते प्रा. डॉ.एन. डी. पाटील सर,काॕ. गोविंदराव पानसरे अण्णा आणि तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब! हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर नागरिक या मोर्चाच्या विरोधात एकत्र जमले आणि संविधानिक मार्गाने त्यांनी ज्या ठिकाणी यज्ञ होणार होता तिथपर्यंत मोर्चाने चालत जायचे ठरवले. या मोर्चाचे नेतृत्व हे तिघेजण करत असल्यामुळे आणि जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त तगडा लावलेला होता. तेव्हाची कोल्हापूरचे डीवायएसपी तुषार पाटील हे ह्या बंदोबस्ताचे नेतृत्व करत होते. या मोर्चामध्ये मीही सहभागी झालो होतो. माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय मोर्चा होता. कारण या तीन दिग्गजांच्या नेतृत्वाखाली जो कोल्हापुरातून ऐतिहासिक अशा प्रकारचा मोर्चा निघाला त्या मोर्चात त्या सर्वांच्या बरोबर मलाही चालण्याची एक संधी मिळाली होती. मोर्चा शिवाजी पुतळ्याजवळ आल्यानंतर डीवायएसपी तुषार पाटलांनी हा मोर्चा अडवला आणि ते एनडी सरांशी हुज्जत घालू लागले. तुम्हाला यज्ञाच्या ठिकाणी मोर्चा घेऊन जाता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.दुसर्या बाजूने जावं लागेल,यज्ञापासून दूर थांबावं लागेल असं ते हातवारे करत बोलू लागले. त्या वेळी मात्र एनडी सरांचा पारा चढला आणि एनडी सरांनी हातवारे करून बोलणाऱ्या डीवायएसपी तुषार पाटलांना खडसावलं."मिस्टर पाटील तुमचं जेवढं वय आहे, त्याच्या पेक्षा जास्त काळ मी कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. तुम्ही मला कोल्हापूरचा नकाशा शिकवता का ?" एनडी सर संतप्त झाले होते.त्यामुळे जमाव प्रक्षुब्ध झालेला होता. परंतु एनडी सर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी या जमावाला एका वाक्यात आवरलं. "आपल्याला दंगा करायचा नाही. आपण संविधानिक मार्गाने आपला विचार पुढे न्यायचा आहे "असं सांगितलं आणि जमाव शांत झाला. तिथेच खुर्च्या आणल्या गेल्या. तीन दिग्गज नेते त्या ठिकाणी त्या खुर्चीत बसले आणि मग सभेला सुरुवात झाली. मग या तिन्ही दिग्गज नेत्यांनी कोल्हापूरची समतावादी विचार परंपरा विषद केली आणि या मोर्चाला आपण का विरोध करत आहोत याचं अत्यंत मार्मिक आणि सुस्पष्ट विश्लेषण केलं. आणि त्यानंतर मग हा मोर्चा विसर्जित झाला. परंतु एनडी सरांचा तो आवेश आणि तार्किक, विवेकी आणि अभ्यासू मांडणी ही संस्मरणीय होती. असे अनेक लोकलढे सरांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाले. कोल्हापुरातून संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारे लढे त्यांनी उभारले. आज सरांचे निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळी मध्ये कधीच भरून न येणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे.मिस यु एन. डी. सर!तुमचं प्रत्येक वाक्य आणि तुमची प्रत्येक आठवण आम्हाला संघर्षाच्या वाटेवर चालायला अधिक बळ देईल! लडेंगे !जितेंगे!🙏🙏🙏
*प्रा.प्रकाश नाईक* ८३७८८४९५९५
Most ser History is like mi ......
ReplyDelete