*माणसाच्या मुक्तीसाठी लढणारा महापुरुष- स्वामी विवेकानंद*

*माणसाच्या मुक्तीसाठी लढणारा महापुरुष- स्वामी विवेकानंद*   प्रस्थापित भारतीय समाजव्यवस्थेला हादरे देणारा आणि भारताला आधुनिक बनविण्यासाठी संघर्षरत असणारा महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदांकडे पहावे लागते. परंतु स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा गाभा समजून न घेता त्यांना एका विशिष्ट धर्माशी जोडून ठेवणे हे  त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच आहे. स्वामी विवेकानंदांनी  हिंदू धर्माच्या अंगाने जरुर मांडणी केली असली तरी त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन हा निश्चितपणे पारंपरिक पद्धतीचा नव्हता. धर्माच्या पलिकडे जाऊन खर्‍या अर्थाने माणसाचा सन्मान करणारा असा विचार त्यांच्या जीवनाचा गाभा होता, असे दिसून येते. ख्रिश्चन, इस्लाम आणि बौद्ध धर्म परंपरेतील माणसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वीकारून खऱ्या अर्थाने एक निखळ मानव्याचा विचार प्रस्थापित करणे, रुजवणे हेच विवेकानंदांचे ध्येय होते. त्यांनी केलेली भाषणे आणि त्यांनी मांडलेले विचार आपण सूक्ष्मपणे तपासून घेतले तर स्वामी विवेकानंद हे भारताला कशाप्रकारे बदलवू पाहत होते, हे नीटपणे लक्षात येते.त्यांचे वडील विश्वनाथ बाबू हे कोलकत्यातील एक नामांकित वकील होते आणि ते उदारमतवादी व आधुनिक विचारांचे होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी या माणुसकीला आणि दया भावनेला महत्त्व देणार्‍या होत्या. त्यांनी एका मिशनरी ख्रिश्चन महिलेकडे प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण घेतलेले होते. म्हणजेच आई आणि वडिलांच्या कडून त्यांना आधुनिकतेचे आणि करुणा  व दयाभावनेचे संस्कार मिळाले होते,हे आपण ध्यानात घेतले पाहिजे .अवघ्या ३९ वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगभर आपल्या विचारांची छाप उमटवली. याचे  कारण त्यांच्यावर झालेल्या वेचारिक संस्कारात  आपल्याला दिसून येते, त्यांची जडण-घडण त्यांच्या बालपणापासूनच झालेली होती.  घरातले वातावरण विज्ञानासाठी पूरक अशा स्वरूपाचे होते. त्यामुळेच औपचारिक शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रचंड अवांतर वाचनही अत्यंत कमी वयामध्ये केलेले होते.  जगभरातील विविध तत्त्वज्ञ, लेखक, कलावंत ,शास्त्रज्ञ यांच्या संदर्भातील लेखन त्यांनी वाचून काढले होते. समाजशास्त्र, राज्यशास्त्र ,इतिहास, विज्ञान ,साहित्य, धर्म, संस्कृती अशा विषयांवरही त्यांचे अत्यंत चिंतन होते. यामुळेच या विविध ज्ञान शाखांचे आकलन अधिक सखोल आणि चिंतनीय असे त्यांचे झाले होते. आणि त्यांची दृष्टी अत्यंत व्यापक विशाल बनलेली होती.शिकागोच्या सर्वधर्म परिषदेसाठी जात असताना स्वामी विवेकानंद प्रवासादरम्यान आपल्या शिष्यांना पत्र लिहून  सांगतात," भारत आज कोणत्या केविलवाण्या अवस्थेत हे तुम्ही जाणताच. जरा इकडे या. हे लोक पहा.आणि शरमेने आपले तोंड झाकून घ्या. पण परंपरेचे गुलाम असलेले तुम्ही लोक समुद्र प्रवास करून इकडे येणार कसे? आपल्या सर्वांच्या डोक्यावर कर्तृत्वशून्यतेचे अवजड ओझे आहे. त्या भाराखाली आपण आपले माणूसपण हिरावून बसलोय. आपल्या विकृत कालबाह्य  रुढींमुळे आपण आपल्या भावांचा अपमान करून त्यांना वाईट वागणूक देत आलोय. यातून प्रथम बाहेर या.प्रथम माणूस बना.ज्यांचा  प्रगतीला नेहमीच विरोध असतो त्या पुरोहितांना झुगारुन द्या. पुरोहितशाही उखडून टाका." म्हणजे त्या ऐतिहासिक धर्मपरिषदेत भाषण देण्यासाठी जात असताना विवेकानंद रुढीग्रस्त हिंदू धर्मावर हल्लाबोल करत असल्याचे दिसते.शिकागोला पोहचल्यानंतरही त्यांना परिषदेत सहभागी होता येईल का याविषयी साशंकता होती.कारण त्यांचाकडे कोणत्याही धार्मिक संस्थेचे शिफारसपत्र नव्हते.परंतु हाॕवर्ड विद्यापीठातील प्रो.जाॕन राईट,प्रो.केट सॕनबाॕर्न आणि जगद्विख्यात बौद्ध भिक्खू अनगारिक धम्मपाल यांच्या सहकार्याने विवेकानंदांना परिषदेत बोलण्याची संधी मिळाली.त्यांचे पहिलेच वाक्य होते,"my sisters and brothers of america"या वाक्याने इतिहास घडविला.टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.परंतु या भाषणात एवढेच वाक्य महत्वाचे नव्हते तर भाषणाच्या अखेरीस स्वामी विवेकानंद म्हणाले होते,"सकाळी जे घंटानाद झाले त्याचा अर्थ समजावून घ्या.ही धर्मवेडेपणाची मृत्यूघंटा आहे.तलवार आणि लेखणी यांच्या साहाय्याने माणसांच्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळांचा अंतिम क्षण आता जवळ आलाय.."   म्हणजेच या भाषणातून त्यांनी धर्मातल्या विकृतीवर कठोर हल्ला चढविला आणि सर्व धर्मांच्या पलिकडे जाऊन अखिल 'मानव्या'चा पुरस्कार केला. या ऐतिहासिक भाषणानंतर विवेकानंदांनी त्या अमेरिका दौऱ्यात  सुमारे पाच भाषणे केली. त्यामध्ये त्यांनी हिंदू आणि बौद्ध धर्माचा परस्पर संबंध उलगडून दाखविला. हिंदू धर्मातील अनेक संकल्पनांचा परिचय त्यांनी करून दिला. त्याचबरोबर मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांविषयी त्यांनी आपली मते व्यक्त केली. अर्थात सर्व भाषणामध्ये प्रत्येक धर्मातल्या वाईट आणि  कालबाह्य गोष्टींवर त्यांनी अत्यंत आक्रमकपणे सडकून टीका केली.              स्वामी विवेकानंदांनी स्वतःला हिंदू धर्माचे प्रचारक असे कधीही संबोधलेले नाही.उलट प्रो.जाॕन  राईट यांना लिहलेल्या एका पत्रात ते म्हणतात,"मुक्ती,स्वातंत्र हाच माझा एकमेव धर्म आहे.त्यावर कोणी बंधन घालण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच्याशी सर्वशक्तिनिशी झुंज देईन आणि ते जमलं नाही तर दूर निघून जाईन." याचा अर्थ विवेकानंद हे स्वतःला एका धर्माशी बांधून घेत नव्हते तर स्वातंत्र्य या मुल्याशी जोडून घेत एक नवा मुक्तीदायी विचार मांडत होते. भारतातील जातीयता,अज्ञान,दारिद्रय या विषयावर सडेतोडपणे व्यक्त होत होते. बुद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांच्या विचारावर खूप मोठा प्रभाव असल्याचेही दिसून येते. त्यांनी वेळोवेळी बुद्धाबद्दल अपार कृतज्ञताभाव व्यक्त केलेला आहे. बुद्धाच्या कारुण्याची आपल्या कृतीशी   सांगड घालण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे . विवेकानंद हे अत्यंत बु बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकवादी होते. धर्माचे कोणतेही म्हणणे बुद्धीच्या निकषावर पारखून घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. बुद्धीचा निकष लावून द्यायला धर्म का तयार होत नाहीत? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. "विचारांना चालना दिली पाहिजे. माझा बुद्धीवर विश्वास आहे. मी बुद्धीचे अनुकरण व अनुसरण करीत असतो. केवळ ग्रंथातील वचनांवर किंवा दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत गेलो तर काय भयंकर होते हे मी बघितलेले आहे. माझा जन्म अशा देशात झाला की, ज्या देशात विश्वास ठेवण्याचा अगदी कहर झाला आहे. फलज्योतिष आणि तत्सम सर्व गोष्टी ही दुर्बल मनाची लक्षणे आहेत ."असे विवेकानंदांनी म्हटले आहे.या सर्व विचारातून पोथीनिष्ठ व ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते तर बुद्धिप्रामाण्याण्यवादी होते हे दिसून येते.त्यांचा ज्योतिषासारख्या गोष्टींवर विश्वास नव्हता  तर सत्यावर म्हणजे विज्ञानावर होता,हेसुद्धा स्पष्ट होते. विवेकानंद म्हणतात स्वतंत्र विचार करा व चिकित्सा करा. खरे पाहता त्यांचा हा विचार  हा विचार प्रचलित धर्मविचारांना छेद देणारा आहे. २जानेवारी १८९९  ला त्यांनी बेलूर मठाचे चे उद्घाटन केले . या मठाचे मॉडेल  बुद्धाच्या संघाशी मिळतेजुळते होते. "उपाशी माणसाला धर्म सांगू नका. लोकांशी वितंडवाद करू नका. चुगल्या, कुचाळक्या करू नका. तांत्रिक गोष्टीवरून टोकाला जाऊ नका.सर्व जाती, धर्माच्या पंथांच्या लोकांना  मठांमध्ये प्रवेश द्या." या त्यांनी शिष्यांना केलेल्या सूचना लक्षात घेतल्या तर त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट होते.जातीधर्माच्या पलिकडे जाऊन विश्वबंधुत्वाचा विचार    त्यांना पुढे घेऊन जायचा होता.प्रेम,दया,करुणा,बंधुभाव,   स्वातंत्र्य  यावर आधारलेली आणि विज्ञाननिष्ठेचा  पाया असलेली समाजरचना त्यांना अपेक्षित होती.आजच्या तरुण पिढीने स्वामी विवेकानंदांचे  विचार अभ्यासले पाहिजेत.त्या विचारांचा समकालाशी असलेला संबंध समजून घेतला पाहिजे.तरच धर्माचा चुकीचा अर्थ लावून माणूस माणुसकीला मातीमोल करु पाहणाऱ्या विकृतीला आळा बसू शकेल.                                             *प्रा.प्रकाश नाईक*                             श्री शिव-शाहू महाविद्यालय,सरुड.             ८३७८८४९५९५

Comments

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

आपकी याद आती रही रातभर