*अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक विचार* 

 *अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक विचार*       सत्यशोधक अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचं नाव. आपल्या समग्र साहित्यातून त्यांनी माणसाच्या महानत्वाचा विचार पेरण्याचे काम केले .त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू माणूस हाच होता. ज्या अन्यायी शोषणवादी व्यवस्थेने माणसाला चिरडले ,भरडले अशा व्यवस्थेच्या विरोधात आपल्या शब्दांच्या माध्यमातून एल्गार पुकारण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले.मानवतावादी व लोकशाहीवादी विचार मूल्यांचा जागर अण्णाभाऊंच्या साहित्यातून दिसून येतो. विषमतावादी जातीव्यवस्थेमुळे त्यांना अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकता आली.त्यानंतरच्या संघर्षमय जीवनात त्यांनी जे अनुभवलं तेच त्यांनी साहित्यात मांडलं. ३२ कादंबऱ्या,१४ कथा संग्रह ,११लोकनाट्ये, १३ पोवाडे, १प्रवासवर्णन, १ नाटक अशी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. या समग्र साहित्यातून त्यांनी विज्ञाननिष्ठा आणि मानवी मूल्यांचा उद्घोष केला. त्यांच्या साहित्यातून विवेकी,बुद्धिप्रामाण्यवादी विचार येतो.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने या देशातल्या अनिष्ट रुढी, प्रथा ,परंपरा   व चालीरीती  यांना उध्वस्त केले. विज्ञाननिष्ठ विचार अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या समग्र साहित्यमधून मांडला. 'वैजयंता' या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी असे म्हटले आहे की," या देशातल्या जुन्या चालीरीती संपाव्यात ,वैर संपावे आणि या देशाचे नंदनवन व्हावे. या देशात समता नांदावी.  अशी स्वप्न मला रोज पडतात.ही स्वप्ने बघतच मी लिहितो."  देशामध्ये समता नांदावी आणि या देशातल्या जुन्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा  व प्रथा यांचा नायनाट व्हावा, असे त्यांना वाटत होते. म्हणजेच त्यांच्या लेखणीचे प्रयोजन आपल्याला यातून स्पष्टपणे दिसून येते.  ज्या चालीरीती आणि प्रथा परंपरांमधून माणसाचे अवमूल्यन होते, माणसाचा अवमान होतो त्या संपल्या पाहिजेत, हीच अण्णा भाऊ साठे यांची भूमिका होती. प्रचलित समज आणि रुढींची त्यांनी चिकीत्सा केली.बुद्धिप्रामाण्याच्या आणि विवेकाच्या कसोटीवर तपासून त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या .२ मार्च १९५८ रोजी संपन्न झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटकीय भाषणात त्यांनी एक क्रांतिकारी विधान केले.ते म्हणाले,"  ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे." पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे हा समज धर्माने समामनामध्ये रुजवला होता. या गैरसमजाला अण्णा भाऊ साठेंनी  हादरा दिला. ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या हातावर चालते असा एक महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडला. म्हणजे आज विज्ञानाने पृथ्वीचे स्थान व रचना याबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या  असताना समाजात मात्र असा समज रुढ होता की ,पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे. या अवैज्ञानिक समजाला त्यांनी छेद दिला.  त्यांनी धर्माच्या नावावर चालणाऱ्या अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा यांनाही आपल्या साहित्यातून  विरोध केला. 'चिखलातील कमळ' नावाची त्यांची कादंबरी या संदर्भात विचार करण्या योग्य आहे. त्या कादंबरीची नायिका सीता हिची आई ही मुरळी असते. मुरळीच्या पोटी जन्म घेतला म्हणून सीताला सुद्धा मुरळी व्हावे लागते व खंडोबा सोबत लग्न करावे लागते .तेव्हा सीता हा प्रश्न विचारते की," माझ्या आईबरोबर ज्या देवाचे लग्न झाले, तो देव जर माझा बाप होत असेल तर मग मी बापाबरोबर लग्न कशी काय करणार?" हा बिनतोड सवाल ती उभा करते.मुरळीप्रथेसारख्या अनिष्ट परंपरेला ती विरोध करते.  बळी नावाच्या तरुणाशी ती लग्न करते व या परंपरेला नकार देते. सीताचा हा विद्रोह धर्मातील अनिष्ट रूढीं आणि स्त्रियांच्या शोषणाच्या  विरोधात बंड करणारा आहे,हे दिसून येते.'डोळे 'या सुंदर कथेतून त्यांनी अतिशय प्रभावीपणे विकृत रूढी प्रथांना विरोध केला आहे.या कथेतून अण्णा भाऊ साठे यांनी  वैज्ञानिक विचार मांडण्याचेच काम केले आहे.या कथेची नायिका राधा ही खूप देखणी असते. नवरा तिच्यावर सातत्याने संशय घेत असतो.तिचे दिराबरोबर अनैतिक संबध असतील या संशयाने तिला छळत असतो. शेवटी खर्या  खोट्याचा न्याय निवाडा करण्यासाठी राधाला तो विशाळगडावर घेऊन जातो.  तिथला पूजारी उकळत्या तेलात  एक पैसा टाकतो  आणि तिला सांगतो की," या तेलातला पैसा काढ.तो पैसा काढताना  तुला भाजलं नाही तर तू निर्दोष .भाजलं तर मात्र तू अपवित्र ,दोषी."  तेव्हा राधा अत्यंत धाडसाने त्या पुजार्यला सुनावते की," तुम्हीच तो पैसा काढा. तुमचा हात भाजला तर मी पापी आणि जर तुमचा हात भाजला नाही तर मी निर्दोष."तिच्या या पवित्र्याने पुजारी आणि तिचा नवरा हडबडून जातात. राधाने अतिशय धाडसाने असा विचार मांडणे  म्हणजे बुवाबाजीला केलेला प्रखर विरोध होता, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्या कथेतील राधाला आपल्या या बंडखोर विचारांची किंमत  मोजावी लागते.  अण्णा भाऊ साठे समाजातल्या भोंदू बुवा, बाबांच्या विरोधात आपल्या पात्रांच्या माध्यमातून कसे लढत होते,त्यांना उघडे पाडत होते,हे या कथेतून दिसून येते.अण्णा भाऊ साठे यांची 'मरीआईचा गाडा'ही  कथा अत्यंत प्रभावी आहे. गावात  अचानक आलेली  साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर घडणारे  नाट्य  या कथेतून मांडण्यात इले आहे. गावातील लोक आजारी पडू लागले. तेव्हा गावात मरीआई  शिरल्यामुळेच हे सारे घडले आहे आणि यातून सुटका करण्यासाठी गावाने मरीआईचा गाडा काढला पाहिजे, असा चुकीचा आग्रह गावातली काही ज्येष्ठ मंडळी करतात. तेव्हा मरी आईचा गाडा काढून  गावात चाक बंद केले पाहिजे, अशी ही ज्येष्ठ मंडळी भूमिका घेतात. तेव्हा एक वैज्ञानिक दृष्टी घेऊन काम करणारा नव्या पिढीतला एक तरुण 'नाना'  हा या पारंपारिक अंधश्रद्धेला विरोध करतो. आणि गावात आलेला साथीचा रोग मरीआई मुळे होत नसून तो अस्वच्छतेमुळे होतो असे गावकर्यांना पटवून देतो. तालुक्याच्या गावावरून आपण डॉक्टर बोलावून गावातल्या रुग्णांच्या वरती उपचार करू असा विचार सगळ्या गाववाल्यांना सांगतो. चाक बंद करायचे असेल तर गावातून जाणाऱ्या रेल्वेचे चाक आपण कसे बंद करणार ?हा प्रश्न  त्यांच्या पुढे उपस्थित करतो. त्यानंतर मात्र गावकऱ्यांना त्याची भूमिका पटते या कथेतून अण्णाभाऊ साठे यांनी पुरोगामी विचाराच्या तरुण नायकाच्या माध्यमातून अंधश्रद्धेला विरोध दर्शविला आहे  आणि अंधश्रद्धेतला समर्थन  करणाऱ्यांचे प्रबोधनही केले आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून अंधश्रद्धेला आकार आणि विज्ञानाचा स्वीकार हे सूत्र अधोरेखित होते.भारतीय समाजाला जसे 'देव'या संकल्पनेने झपाटले आहे तसेच 'भूत'या संकल्पनेने सुद्धा झपाटले आहे. केवळ या अंधश्रद्धेमुळे कित्येक लोकांचे प्राण गेले आहेत .कित्येक  लोकांना शारीरिक इजा पोहोचवण्यात आलेली आहे.भूत या संकल्पनेतला फोलपणा 'तीन भाकरी' या नावाच्या कथेमधून उघड केला आहे. या कथेतून त्यांनी भूत या संकल्पनेवरती कठोर प्रहार करत ही संकल्पनाच खोटी आहे , हे त्यांनी दाखवून दिले आहे .अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विचारातून आणि साहित्य लेखनातून नेहमीच प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. ज्योतिष पाहणे, मुहूर्त पाहणे आणि दैववादाला शरण जाणे या गोष्टींना अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून  नकारच दिला गेला आहे. खुळचट कल्पनांना थारा न देता  जाऊन आपण प्रयत्नवादाचा अंगीकार केला पाहिजे, अशी  त्यांनी भूमिका घेतली.या संदर्भातल्या त्यांच्या काही महत्त्वाच्या कलाकृती आपल्याला उदाहरण  म्हणून घेता येतील. त्यांचा 'बंगालचा हाक' नावाचा पोवाडा अतिशय सुप्रसिद्ध आहे. बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे बंगाली जनतेची झालेल्या दुर्दशेचे  चित्रण अण्णा भाऊ साठे यांनी केले आहे. त्याचबरोबर बंगालला आपण वाचवले पाहिजे ,तेथील जनतेच्या  पाठीशी उभे राहिले पाहिजे ,असे आवाहन त्यांनी या पोवाड्यातून केले आहे. परंतु दुष्काळ म्हणजे देवाचा कोप असतो  या  खुळचट कल्पनेला त्यांनी नाकारले आहे.  त्या पोवाड्यात ते म्हणतात," बंगाल बुरुज भारताच्या आघाडीवरला/ रोखून परचक्राला/ अवसर देई आम्हाला/ राष्ट्रीय ऐक्य करण्याला/ म्हणून करा मदत हो त्याला/ सावरून धरा बंगालला/ देवाचा कोप सोडा  या कल्पनेला/" दुष्काळासारखी संकटे नैसर्गिक आहेत. त्या पाठीमागे देवाचा अथवा दैवाचा कोणताही संबंध नसतो. अशा अडचणीच्या काळामध्ये आपण त्या जनतेला सावरलं पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे ,हे अण्णाभाऊंनी या पोवाड्यामधून सांगितले  आहे. या  पोवड्यातून व्यक्त होणारा विचार हा मानवतावादाने  आणि वैज्ञानिक विचाराने ओथंबलेला आहे.धर्माचे दलाल अज्ञानी लोकांना धर्माची, पंचांगाची ,ज्योतिषाची भीती घालून त्यांचे शोषण करतात. त्यांची आर्थिक लूट करतात .त्याबाबत महात्मा फुले यांनी 'तृतीय रत्न' या नाटकातून अशा धर्माच्या दलालांची चिरफाड केली आहे .अगदी त्याच पद्धतीने 'वारणेच्या खोऱ्यात' या पहिल्याच कादंबरीमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी अशा दलालांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. या कादंबरीची नायिका मंगलाचे लग्न ठरवण्यासाठी भटजीकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा नारूमामा नावाचे पात्र म्हणते ,"पाच तिथे परमेश्वर.. मग भटजीची काय जरुरी आहे? आणि भटजीला व पंचांगात पाहूनच सर्व करायचे तर माणसाला काहीच करता येत नाही. लग्नच काय परंतु मुहूर्ताशिवाय उसाला पाणी सुद्धा पाजता येत नाही .आम्हाला मुहूर्ताची वाट पाहत बसावे लागेल. कारण विहीर काढायला, मोट जुंपायला, नांगराला ,कुळवायला, पेरणी करायला ,कुपाण घालायला  साऱ्यालाच मुहूर्त लावून ठेवला आहे आणि रोज उठून मुहूर्त पहायचं म्हटलं तर आमचे बारा वाजतील .अहो, मरायसाठी देखील पंचांग चाळावं  लागेल. म्हणून म्हणतो ,आता नवीन कायदा सुरू करा.." म्हणून पंचांग पाहण्यातला फोलपणा अण्णा भाऊ साठे यांनी  या संवादातून उघड केला आहे. माणसाने कर्तृत्व गाजवावे ,आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा असे सांगितले आहे. नवीन कायदा सुरू करा अशी जी नारुमामा मागणी करतो आहे ती सुद्धा अत्यंत विचार करण्यायोग्य आहे. हा नवीन कायदा म्हणजे ज्या कायद्याचा पाया विज्ञानाच्या विचारावर उभा आहे  असा तो नवीन कायदा आहे. या देशातल्या बहुसंख्य लोकांनी आजपर्यंत अशा धर्माच्या दहशतीत आपली वाटचाल केली .अंधश्रद्धांना बळी पडून मुहूर्त ,पंचांग ,ज्योतिषी'बुवा,बापू,महाराजांच्या   नादी लागून त्यांनी आपले सर्वस्व गहाण ठेवले. मानसिक गुलामगिरी स्वीकारली .अशा समाजाला यातून बाहेर काढायचे असेल तर विज्ञाननिष्ठेवर आधारलेला नवा कायदा अंमलात आणावा लागेल, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण  विवेकी भूमिका अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून घेतली.  अर्थात असा विज्ञाननिष्ठेवर आधारलेला नवा कायदा म्हणजे सर्वांना समता ,स्वातंत्र्य , न्याय देणारा सर्वांशी माणुसकीने राहणारा  कायदा होय. हा नवा कायदा म्हणजेच  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान होय. भारतीय समाजात विज्ञाननिष्ठा, विवेक, बुद्धीप्रामाण्य व संविधानिक मूल्ये रुजविण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारांची ऊर्जा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.                                    *प्रा.प्रकाश नाईक* श्री शिव शाहू महाविद्यालय,सरुड,ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर .४१६२१४  (८३७८८४९५९५)

Comments

Popular posts from this blog

मातंग समाजाच्या प्रबोधन चळवळीतील बिनीचा शिलेदार - शंकरराव भोरे

मजी आमी कुठलं...पाटंवाडीचं??

आपकी याद आती रही रातभर